खडकवासला साखळीत 3.24 टीएमसी साठा | पुढारी

खडकवासला साखळीत 3.24 टीएमसी साठा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: खडकवासला साखळीतील चार प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ 3.24 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी, यावर्षी तीव्र उन्हामुळे पिण्यासाठी पाण्याची वाढलेली मागणी, पाण्याचे झालेले बाष्पीभवन, ग्रामीण भागासाठी घेतलेले एक जादा आवर्तन, तसेच जून महिन्याच्या पहिल्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ या कारणांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिली. मात्र, गेल्या वर्षी पावसाळा संपल्यानंतरही दर महिन्यात झालेला पाऊस आणि मे महिन्यात चक्रीवादळामुळे झालेला पाऊस यामुळे गेल्या वर्षी 2021 मध्ये धरणांत 7.84 टीएमसी पाणीसाठा होता. सन 2020 आणि सन 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणे काठोकाठ भरलेली होती. त्यामुळे सन 2020 मध्ये 5.81, तर सन 2019 मध्ये तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा होता.

परिणामी सन 2019 आणि 2020 मध्ये जलसंपदा विभागाला शहरी आणि ग्रामीण भागाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता आला. सन 2019 मध्ये ‘निसर्ग’, तर सन 2020 मध्ये ’तौक्ते’ चक्रीवादळामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार वादळी पाऊस झाला होता. त्यामुळेही जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमधील पाणीसाठा फारसा कमी झालेला नव्हता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सन 2016 मध्ये निम्मा जून महिना संपल्यानंतरही मोसमी पावसाचे आगमन झाले नव्हते.

तेव्हा धरणांमध्ये अवघा दोन टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून चाचपणी सुरू होती. प्रत्यक्षात ती वेळ आली नाही. सन 2017 मध्ये 14 जूनपर्यंत मोसमी पाऊस सक्रिय झाला नव्हता. त्यामुळे 21 जूनपर्यंत खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत 2.86 टीएमसी पाणीसाठा होता. सन 2018 मध्ये मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा होता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

तीन वर्षांतील 22 जूनचा पाणीसाठा टीएमसीमध्ये
2022 3.24
2021 7.84
2020 5.81
2019 3.00
2018 3.15
2017 2.86

हेही वाचा

जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत

नगर : पाऊस लांबल्याने टँकरची संख्या वाढली

परभणी : सात फुटांचा आढळला धामण साप

Back to top button