

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पाच लाखांचे कर्ज घेतल्यानंतर चार वर्षांत 15 लाख रुपये उकळूनही आणखी 8 लाखांची मागणी करणार्या व बेकायदा सावकारी करणार्या सावकाराला गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने अटक केली. दत्ता गोकूळ वाघमारे (29, रा. विजय विहार अपार्टमेंट, प्रितनगर सोसायटी, चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत रियाज अहमद महमदअली शेख (38, रा. जयजवाननगर, येरवडा) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी संशयित आरोपी वाघमारे याच्याकडून 2018 मध्ये 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते.
चार वर्षांत त्यांनी वाघमारे यांना तब्बल 15 लाख देऊनही वाघमारे हा त्यांच्याकडे आणखी 8 लाखांची मागणी करत होता. याच पैशांसाठी त्याने शेख यांच्या घरात शिरून त्यांना दमबाजी करत मुद्दल व व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केल्याने हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने वाघमारेला बेड्या ठोकल्या.
हेही वाचा