हिंगोली : १६ कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा १०० टक्के निकाल | पुढारी

हिंगोली : १६ कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा १०० टक्के निकाल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 93.53 टक्के लागला आहे. जिल्ह्यात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात मुली पास होण्याचे प्रमाण 94.81 टक्के आहे. तर, 92.59 टक्के मुले पास झाले आहेत. बारावी परीक्षेच्या निकालात हिंगोली जिल्ह्याने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील 16 कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

हिंगोली जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. हिंगोली जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी 13,165 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12, 314 विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये 2108 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले असून 6073 विद्यार्थी प्रथमश्रेणीत, 3872 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात 7599 मुलांपैकी 7036 मुले पास झाली असून त्यांची टक्केवारी 92.59 टक्के आहे. तर, 5559 पैकी 5280 मुली पास झाल्या असून त्यांची टक्केवारी 94.81 टक्के आहे. त्यामुळे यावर्षीही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
जिल्ह्यात विज्ञान शाखेत 5511 विद्यार्थ्यांपैकी 5380 विद्यार्थी पास झाले असून निकाल 97.62 टक्के, कला शाखेत 6574 पैकी 5953 विद्यार्थी पास झाले असून निकाल 90.55 टक्के, वाणिज्य शाखेतील 757 विद्यार्थ्यांपैकी 706 विद्यार्थी पास झाले आहेत. निकाल 93.26 टक्के, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात 326 पैकी 277 विद्यार्थी पास झाले असून निकाल 84.96 टक्के लागला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button