Legislative Council elections : भाजपने मेटे, सदाभाऊ खोत यांचाही पत्ता कापला | पुढारी

Legislative Council elections : भाजपने मेटे, सदाभाऊ खोत यांचाही पत्ता कापला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीसाठी  (Legislative Council elections) तिकीट वाटप करताना भाजपने शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचाही पत्ता कापला आहे. रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर आधीच अडगळीत गेले असताना भाजपने घटक पक्षांच्या या दोन नेत्यांनाही धक्का दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council elections) भाजपचे ६ सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यात विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. मात्र भाजपने २० तारखेला १० जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पाच जणांच्या यादीत मेटे, जानकर यांना वगळले आहे. जानकर यांना पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, मेटे यांना पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. त्यावर या नेत्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान, यावेळी विधान परिषदेसाठी भाजप पंकजा मुंडे यांना संधी देईल, अशी चर्चा होती. पंकजा मुंडे यांनीही पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोनं करण्याचे संकेत दिले होते. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. पाच जणांच्या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव कट करण्यात आले आहे.

तर अपेक्षेप्रमाणे प्रवीण दरेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर प्रसाद लाड यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. भाजप राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना संधी देईल, अशीही चर्चा होती. मात्र भाजपने उमा खापरे यांना संधी दिली आहे. तसेच प्रा. राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देत मूळ भाजपच्या नेत्यांनाही स्थान दिले आहे. त्याचबरोबर भाजपच्या घटक पक्षांतील नेत्यांनाही डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांतून नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button