माजलगाव : प्रसुतीदरम्यान माता बालकाचा मृत्यू; डॉ. जाजु दाम्पत्यावर हालगर्जीपणाचा आरोप | पुढारी

माजलगाव : प्रसुतीदरम्यान माता बालकाचा मृत्यू; डॉ. जाजु दाम्पत्यावर हालगर्जीपणाचा आरोप

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील शिवाजीनगर भागात असलेल्या डॉ. जाजु दाम्पत्याच्या असलेल्या जाजु हॅास्पिटल या ठिकाणी एका गरोदर मातेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १६) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. डॅाक्टरांनी पेशंट गंभीर असल्याची वेळीच कल्पना न दिल्यामुळे माता बालकाचा जीव गेला असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत एकच टाहो फोडला. तसेच डॅाक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे जाजु हॅास्पिटल जवळ तणाव निर्माण झाला. जवळपास चार तास मृतदेह दवाखान्यात होता.

खेर्डा (ता. माजलगाव) येथील २२ वर्षीय महिलेला रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान प्रसुतकळांचा त्रास सुरू झाला. प्रसुतीसाठी या महिलेला जाजु हॅास्पिटल येथे दाखल करण्यात आले. सोनाली पवन गायकवाड असे या महिलेचे नाव आहे. मागील ९ महिन्यांपासुन याच ठिकाणी तिची ट्रिटमेंट चालु होती. पहाटे ६ वाजताच्या सुमारास सदर महिलेची परिस्थिती गंभीर झाली असता औरंगाबाद या ठिकाणी जाण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. परंतु उपचाराकरिता पुढील तयारी करेपर्यंतच त्या महिलेचा मृत्यू झाला.

या हॅास्पिटलमधील डॉ. उर्मिला जाजु यांनी योग्यवेळी आम्हाला पेशंटच्या प्रकृतीचा माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधीत महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप संतप्त नातेवाईकांच्या जमावाने केला. त्यामुळे हॅास्पिटल परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.

जोपर्यंत डॅाक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हालवु देणार नाही, अशी तीव्र भुमिका नातेवाईकांनी घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, ए.पी.आय. केंद्रे व शहरातील प्रतिष्ठीत नागरीक पत्रकारांनी संतप्त जमावाला शांत करत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीसात जाण्याचे सांगीतले. नंतर हा जमाव गुन्हा दाखल करण्यासाठी माजलगांव शहर पोलीसांत गेला. त्या ठिकाणी जाजु दाम्पत्यावर तक्रार दाखल करुन घेण्यात आली. तांत्रीक बाबींचा तपास करुन तसेच शवविच्छेदन अहवालावरुन योग्य तो गुन्हा दाखल करण्याची हमी पोलीसांकडून देण्यात आली. त्यानंतर संतप्त जमाव शांत झाला. यानंतर संबंधीत महिला व बालक यांचे मृतदेह अंबाजोगाई या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. मयत सोनाली गायकवाड हिची ही पहिलीची प्रसुती होती. त्यात तिचा आणि बाळाचा मृत्यु झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतांना दिसुन येत होती.

दरम्यान जाजु हॅास्पिटल या ठिकाणी ही तिसरी ते चौथी घटना असल्यामुळे सदर डॅाक्टर दामपत्याचा परवानाच रदद करण्यात यावा अशी देखील मागणी समोर येत आहे.

आम्हाला वेळीच कल्पना दिली असती तर आज दोन जीव वाचले असते : नातेवाईक

सोनाली हिची मागील 9 महिन्यांपासुन याच डॅाक्टरकडे ट्रिटमेंट सुरु होती त्यामुळे त्यांना पेशंटची सर्व कल्पना होती. सोनालीला रविवारी संध्याकाळी 7 वाजताच आम्ही प्रसुतीसाठी दाखल केले होते. रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान पेशंटला झटका आला या बाबत;R कल्पना दिल्यानंतर डॅाक्टरांनी वेळीच आम्हाला योग्य तो सल्ला दिला असता तर दोन जीव वाचले असते. डॅाक्टरांच्या हालगर्जीपणामुळेच माता व बालकाचा मृत्यु झाला आहे.

अंबाजोगाई येथे उपचारासाठी रेफर लेटर देवून पाठवलेले होते : डॅा. उर्मिला जाजु, संचालिका जाजु हॅास्पिटल

सदर पेशंटवर मी गेल्या 9 महिन्यांपासुन योग्य उपचार केलेले आहेत. प्रसुतीसाठी आल्यानंतर परिस्थिती व्यवस्थित होती तसेच बाळाची तब्येत नाजुक असल्याबाबतचीही कल्पना दिली आणि सदर महिलेची प्रसुती देखील नातेवाईकांच्या संपुर्ण संमतीने नॅार्मल केली. रात्रभर मी माझ्या केबीनमध्येच होते व वेळोवेळी लक्षही ठेवून होते. परंतु सदर पेशंटला झटका आल्यानंतर त्यासंदर्भातील उपचार देखील वेळीच केले, परंतु परिस्थिती गंभीर होत असल्याने सदर महिलेला औरंगाबाद किंवा अंबाजोगाई येथे उपचारासाठी रेफर लेटर देवून पाठवलेले होते.

हेही वाचा

Back to top button