बीड : प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

बीड : प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : गावातील एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून अप्सरा आहेस, असं म्हणून तिच्याशी लग्न केलं. काही दिवस होत नाही, तोच लग्नाच्या संसाराला काळिमा फासणारी घटना ४ मेरोजी गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथे घडली. प्रेमात आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घालणाऱ्या प्रेमवीराकडून पत्नीला त्रास देण्यास सुरूवात झाली. ५ लाख बापाकडून घेऊन ये, म्हणून पती, सासू, सासऱ्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. प्रेमविवाह झाल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांत ही थरकाप उडवणारी घटना घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती की, गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथील तरुण तरूणीचे एकमेकांवर प्रेम जडले. तेव्हा प्रेमिका असताना ती अप्सरा वाटत होती. लग्न करणार तर हिच्याशीच असे म्हणत आयुष्यभर सोबत रहाण्याच्या आणाभाका घेतल्या. परंतु कुटुंबातील व्यक्ती लग्नाला विरोध करतील, म्हणून दोघेही घरातून पळून गेले. कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना शोधून २३ फेब्रुवारीरोजी प्रतीक्षा व अजयचे लग्न लावून दिलं. यानंतर महिनाभर त्यांचा चांगला संसार चालला. मात्र, त्यानंतर पती, सासरा, सासूने प्रतीक्षाला त्रास देण्यास सुरुवात केली. पती नेहमीच तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणून मारहाण करु लागला . हुंडा म्हणून ५ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा मागे लावला. तसेच तिला मानसिक, शारीरिक त्रास देऊ लागले.

याच कारणातून शनिवारी (दि.१४) दुपारी १ च्या सुमारास पती अजय सुरेश राजगुडे, सासरा सुरेश शहादेव राजगुडे, सासू संगीता सुरेश राजगुडे यांनी संगनमत करून प्रतीक्षाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. ज्याच्यावर प्रेम केलं, कुटुंबाला विरोध करुन लग्न केलं. तोच जीवावर उठल्याने प्रतीक्षाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत विह्रिरीच्या दिशेने धाव घेतली. परंतु, काही जणांनी तिला अडवून आत्महत्येपासून रोखले.

यानंतर प्रतीक्षा अजय राजगुडे ( रा .दिमाखवाडी, ता. गेवराई) हिने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून पती अजय , सासरा सुरेश राजगुडे, सासु संगीता राजगुडे सर्व (रा. दिमाखवाडी, ता.गेवराई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे करत आहेत. या घटनेतील आरोपी फरार असल्याचे तपास अधिकारी यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button