चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडायला गेलेला मजूर ठार | पुढारी

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडायला गेलेला मजूर ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या एका ५६ वर्षीय मजुरावर जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी (१६ मे) उघडकीस आली. खुशाल गोविंदा सोनुले (रा. भादुर्णा, ता. मूल) असे मृताचे नाव आहे. ही घटना मूल तालुक्यातील मारोडाच्या जंगलात घडली.

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहने जाळली

दरवर्षी उन्हाळा आला की तेंदूपत्ता तोडायला सुरुवात होते. गोरगरीब मजुरांना तेंदुपत्ता संकलनातून रोजीरोटी उपलब्ध होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तेंदूपत्ता तोडण्याकरिता जंगलात जातात. अशाच प्रकारे मारोडा येथील जंगलात तेंदुपत्ता तोडायला भादुर्णी येथील खुशाल गोविंदा सोनुले हे रविवारी गेले होते. सोबत काही नागरिकही होते. इतर सोबती तेंदूपत्ता तोडून घरी आले, परंतु खुशाल सोनुले सायंकाळ झाली तरी घरी परले नाही. याची माहिती मिळताच सर्वत्र सोनुले यांची शोधाशोध सुरु झाली. बराच वेळ शोधाशोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा लागला नाही.

सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिका-यांनी सोमवारी सकाळी जंगलातून घरी परत न आलेल्या सोनुलेंसाठी शोधमोहीम राबविली. मारोडा बिटातील २ जंगल परिसरात खुशाल सोनुले याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे छिन्नविछिन्न अवस्थेत तुकडे आढळून आले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना मिळताच मूलचे वनपरीक्षेत्राधिकारी नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनसरक्षक वट्टे, यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबियांना २५ हजाराची मदत देण्यात आली आहे.

मे महिण्यात वाघाच्या हल्यात तिघांचा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्यात नागरिक ठार होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी फक्त उन्हाळ्यात महिनाभराच्या हंगामातून शेतकरी शेतमजूर तेंदूपत्ता संकलन व मोहफूल वेचून मिळणा-या आर्थिक स्त्रोतातून उदरनिर्वाह करतात. मात्र वाघाच्या दहशतीमुळे रोजीरोटी हिरावली जात आहे. एकट्या मे महिण्यात तेंदूपत्ता तोडायला व मोहफूल वेचायला गेलेल्या तिघांचा वाघाच्या हल्यात बळी गेला आहे. सोमवारी मूल तालुक्यातील भादूर्णी येथील खुशाल सोनुले याचा पट्टेदार वाघाच्या हल्लात मृत्यू झाला आहे. शनिवारी (१४ मे) रोजी सकाळी ताडोबाच्या बफर झोनध्ये मोहूर्ली येथील जाईबाई जेंगठे ही वयोवृध्द महिला तेंदूपत्ता तोडायला गेली होती. तिचाही वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. तर गुरूवारी (५ मे) मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथील ५२ वर्षीय आडकू मारोती गेडाम याचाही पट्टेदार वाघाच्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला.

Back to top button