राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन वाहने धडकली | पुढारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन वाहने धडकली

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील नरसी नामदेव येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात झाला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ही घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र शासकीय वाहनांचे नुकसान झाले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या नांदेड, परभणी आणि हिंगोली दौऱ्यावरून प्रचंड टीका झाली होती.

राज्यपाल कोश्यारी यांनी बोलविलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीवरून सरकारने आक्षेप घेतला होता.

तसेच नांदेड येथील विद्यापीठाच्या होस्टेलच्या उद्घाटनावरूनही वाद झाला होता.

हिंगोली जिल्हा दौर्‍यावर आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात अधिकार्‍यांची बैठक घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून ते नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी निघाले.

प्रशासनाच्या अधिकार्‍यांसोबत सर्व विभागांचे अधिकारी ही त्यांच्यासोबत नरसी नामदेवकडे निघाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नरसी नामदेव जवळ पोहोचल्यानंतर ताफ्यातील एका स्विफ्ट कार चालकाने अचानक ब्रेक दाबले.

त्यामुळे त्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जीप कारवर आदळली. तर त्या पाठीमागे असलेल्या हिंगोलीच्या अग्निशामक दलाच्या वाहनचालकालाही वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही.

त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या वाहनावर धडकले.

या अपघातामध्ये तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या अपघाता कोणीही जखमी झाले नाही.

या अपघातानंतर अग्निशामक दलाचे वाहन व स्विफ्ट कार बाजूला काढण्यात आली तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्याने ते वाहन ताफ्यासोबत निघून गेले.

राज्य सरकारला अहवाल देणार

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रकारांना सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात केवळ ३५ टक्क्यांपेक्षा कमी सिंचन क्षेत्र असल्याचे या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही इतर विकास कामे प्रलंबित आहेत, त्याचा आढावा राज्यपालांनी घेतला.

जेथे विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत, याबाबत आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांना अहवाल सादर करणार आहोत असे ते म्हणाले.

हेही वाचा: 

पहा व्हिडिओ:  नो किसींग झोन

Back to top button