हिंगोली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास कारावासाची शिक्षा | पुढारी

हिंगोली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास कारावासाची शिक्षा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : घरासमोर खेळत असताना अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून उचलून नेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी २० वर्षीय नराधमास १० वर्षे कारावास व दोन हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.१०) हा निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील एक अल्पवयीन मुलगी ३१ जुलै २०२० रोजी दुपारी साडेचार वाजता घरासमोर खेळत होती. यावेळी गावातील रामा कामन डाखोरे (वय २०) याने त्या मुलीचे तोंड दाबून घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार त्या मुलीने सायंकाळी कामावरून परत आलेल्या तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी थेट आखाडाबाळापुर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

यावरून पोलिसांनी रामा डाखोरे याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर यांच्या पथकाने अधिक तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सदर प्रकरण जिल्हा व सत्रन्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी रामा डाखोरे यास १० वर्षे कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. एन. एस. मुटकुळे यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button