बीड : सख्ख्या भावांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक : एक ठार, एक गंभीर | पुढारी

बीड : सख्ख्या भावांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक : एक ठार, एक गंभीर

धारूर : पुढारी वृत्तसेवा : धारुर तालुक्यातील तेलगाव येथे आज (मंगळवारी) दुपारी साडेबारा च्या सुमारास भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला . आदित्य शंकर राठोड (वय २०) असे मृताचे नाव आहे. तर अभिजित शंकर राठोड (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बाबीतांडा येथून आदित्य व अभिजित हे सख्खे भाऊ मोटारसायकलवरुन तेलगावकडे येत असताना कलंत्री पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. यात आदित्य याचा जागीच मृत्यू झाला. तर अभिजित गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक या वाहनांचा वेग अधिक असतो. अशा वाहनांना वेगमर्यादा घालून दिली पाहिजे. नंबर लवकर लागण्यासाठी ऊस वाहतूक करणारे वाहन चालक वेगाने वाहने हाकतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. दोन दिवसापूर्वी केजमध्ये उसाची गाडी दुचाकीवर पडून जागेवरच दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button