गडचिरोली : लाच घेताना पशुधन विकास अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात | पुढारी

गडचिरोली : लाच घेताना पशुधन विकास अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : कुक्कुटपालन योजनेचा लाभ देण्याकरिता लाभार्थीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चामोर्शी पंचायत समितीचा पशुधन विकास अधिकारी सागर डुकरे (वय ३२) यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (दि.१०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

अधिक माहिती अशी, तक्रारदाराने कुक्कुटपालन योजनेंतर्गत १ हजार मांसल पक्षी मिळण्याकरिता ओचामोर्शी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज केला होता. परंतु, पशुधन विकास अधिकारी सागर डुकरे याने त्यास १० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून सागर डुकरे यास त्याच्याच कक्षात तक्रारदाराकडून १० हजारांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, श्रीधर भोसले यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार प्रमोद ढोरे, हवालदार नथ्थू धोटे, पोलीस नाईक राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, संदीप घोरमोडे, ज्योत्स्ना वसाके, स्वप्नील वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button