देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करणे हे भाबडेपणाचे | पुढारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करणे हे भाबडेपणाचे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रानंतर याबाबतची प्रतिक्रीया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं हा भाबडेपणा आहे. आम्ही या सरकार विरुद्ध लढत आहोत त्यांनी ही या सरकार विरोधात लढलं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या राज्यातील सरकारने हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्या खासदार आणि आमदार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावून त्यांना बारा बारा दिवस तुरुंगात डांबलं, त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार. अशा घटनेनंतर या सरकाकडून कसली अपेक्षा ठेवली पाहिजे. राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा ठेवणे हे भाबडेपणाचे असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांनी केंद्रातील नेत्तृत्वावर टीका केली आहे. याबाबत विचारणा केल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पवार साहेबांनी महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे. येथील बेरोजगारी, युवक, राज्यात निर्माण झालेली अराजकतेची परिस्थिती याकडे त्यांनी लक्ष देऊन इथल्या सरकारला मार्गदर्शन करावे. मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रातील सरकार उत्तम कार्यकरीत आहे. देशातील जनतेने वारंवार मोदीजींना पसंती दिली आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ल्याची आवश्यकता आहे. पवार साहेबांनी त्यांना मार्गदर्शन करावे, असे फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे यांच्या उत्तर प्रदेश येथील अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. या बाबत फडणवीस म्हणाले, त्यांचा का विरोध आहे हे मला माहित नाही. पण, ज्याला रामाच्या चरणात जायचे आहे त्याला तेथे जाऊ द्यावे, असे मला वाटते.

उत्तर प्रदेशचे योगी सरकार आता मुंबईमध्ये कार्यालय स्थापण करणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला वाटते मुंबईमध्ये त्याच्या सरकारचे एक कार्यालय असावे. यात गैर काहीच नाही. यामुळे मुंबईला व महाराष्ट्राला घाबरण्याची काहीच गरज नाही. कुणाच्या कार्यालयामुळे मुंबईला आणि महाराष्ट्राला काही फरक पडत नाही.

Back to top button