औरंगाबाद : मध्यरात्री लोडशेडिंग! तरुणांचा थेट महावितरण कार्यालयात मुक्काम | पुढारी

औरंगाबाद : मध्यरात्री लोडशेडिंग! तरुणांचा थेट महावितरण कार्यालयात मुक्काम

बिडकीन (जि. औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागात अचानकपणे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे. सध्या संपूर्ण पैठण तालुक्यात लोडशेडिंग सुरू झाल्यानं ऐन उन्हाळ्यात लोकांचा घाम निघत आहे. विशेष म्हणजे रेग्युलर वीजबिल भरणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या बिडकीन शहरात मध्यरात्री १२ ते २:३० पर्यंत व दुपारी २:३० ते ४:०० या विचित्र वेळेत भारनियमन दोन दिवसांपासून सुरू आहे. यामुळे रोज मध्यरात्री बिडकीनकर घराबाहेर बसून लाईट येण्याची वाट बघत बसले आहेत. गल्लोगल्ली हे चित्रप दिसत आहे. परंतु तरीही महावितरण वेळा बदलायला तयार नाही, यामुळे नागरिक हैराण आहेत.

संपूर्ण पैठण तालुका आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. परवा रात्रीपासून औरंगाबाद ग्रामीण फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे नागारिकांना उकाडा आणि शेतकर्‍यांना उसाला पाणी देण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.
याचाच निषेध करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आपले अंथरूण पांघरूण थेट महावितरणच्या कार्यालयात काल रात्री मुक्काम करायला गेले होते.यामुळे कमीतकमी महावितरणला जाग येईल आणि भारनियमन बंद होईल, याच अपेक्षेने हे अनोखे मूक आंदोलन केल्याचे सांगितले आहे.

नेहमीच नियोजनाखाली महावितरणाचे अधिकारी वेळकाढूपणा करतात आणि तुटपुंजे कारण देऊन जनतेला वेठीस धरण्याचे काम या अधिकार्‍याकडून होतं. मात्र, महावितरण कंपनी कधी सुधारणार, कधी महावितरणाचा नियमितपणा लोकांना पाहायला मिळणार हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे.

Back to top button