मराठवाडा हा भूप्रदेश जुलमी निजामी हुकूमशाही राजवटीचा म्हणजेच हैदराबाद संस्थानचा भाग होता. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी मराठवाडा, कर्नाटकातील बिदर-भालकी, संतपूर व आंध्र प्रदेशातील तेलंगणा यांना एक वर्षानंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला भारत सरकारच्या पोलिस कारवाईनंतर स्वातंत्र्य मिळाले. उर्दू ही राजभाषा होती. त्यामुळे मराठी भाषेची गळचेपी होणे स्वाभाविक होते.
आज भालकी-संतपूर-बिदर या कर्नाटकातील सीमावर्ती मराठी भागाला लागून असणारे शहर उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, हीच मुळी आनंददायक घटना आहे. मराठी भाषा, मराठी परंपरा, मराठी कला, मराठी साहित्या यांचा हा आगळावेगळा बाज मराठी सारस्वतांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार ज्याप्रमाणे बेळगाव भागातून निवडून येत असत, तसेच सत्तरच्या दशकात भालकी-संतपूर भागातून दिवंगत बापुसाहेब एकंबेकर निवडून येत असत. असे हे व्यामिश्र संस्कृतीचे उदगीर शहर आहे. म्हणूनच यासाठी प्रचंड मेहनत केलेले आयोजक व स्वागताध्यक्ष आमचे मित्र बसवराज पाटील व त्यांचे सहकारी तसेच संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे कौतुक करावे वाटते.
मराठवाडा या प्रदेशाला सामाजिक नि आर्थिक मागासलेपणाची व दारिद्य्राची पार्श्वभूमी असली, तरी साहित्य नि सांस्कृतिकद़ृष्ट्याही संपन्न व श्रीमंत प्रदेश होता. प्रतिष्ठाननगरी म्हणजे आजचे पैठण हे वैभवाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले व संत नामदेवांचे शहर होते व शककर्ते शालिवाहन, देवगिरीचे अतिप्रगत व संपन्न यादव वंशाची राजवट, औरंगाबाद शहर वसविणारे सेनापती मलिक अंबर व शिवाजी महाराजांचे वडील शूरवीर शहाजीराजे (हे मूळ वेरूळचे) भोसले हे युद्ध सहयोगी राहिलेले. दौलताबाद ही देशाची राजधानी बनलेली, असा हा राजकीय वारसा, वेरूळ-अजिंठा लेण्यांचा जागतिक वारसा नि कलात्मक अद्भूततेचा नि बहुधर्मीय साहचरांचा समाज, हे सारे मराठवाडा प्रदेशाचे वैभव अनमोल आहे. पहिली मराठी कवयित्री व महानुभवीय चक्रधरस्वामींची शिष्या महदंबा ऊर्फ महदइसा मराठवाड्यातीलच.
तिने महदंबेचे 1286 मध्ये 148 धवळे रचले. मराठीच्या आद्य ग्रंथकारात मराठवाड्यातील 1188 चा मुकुंदराज यांचा 'विवेकसिंधू' हा पहिला मराठी ग्रंथ मानला जातो. महानुभवीयपंथाचा आद्यग्रंथ 'लीळाचरित्र' (1287) यांतील लीळाही विदर्भ नि मराठवाड्यातून संग्रहित केलेल्या आहेत, असा उल्लेख मिळतो. संत एकनाथांनी तर (1350-1650) 1036 ओव्यांचे चतु:श्लोकी भागवत, एकनाथी भागवत, 1732 ओव्यांचे रुक्मिणी स्वयंवर, 125 विषयांवरील 300 भारुडे या रचना केलेल्या व भागवत धर्माचे जनजागरण केलेले दिसते. जागेअभावी इथे थोडक्यात मांडणी केलेली आहे. मराठीच्या आद्य काळात मराठी मराठवाड्याच्याच अंगाखांद्यावर बहरलेली व फुललेली आहे, हे कसे नाकारता येईल?
आधुनिक काळातही मराठी साहित्याच्या प्रांतात मराठवाड्यातील थोर साहित्यिकांनी मौलिक ठसे व नाममुद्रा कोरलेल्या आहेत. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखा महान समीक्षक, ना. गो. नांदापूरकर, थोर विचारवंत व लेखक प्राचार्य नरहर कुरुंदकर, संत साहित्याचे थोर अभ्यासक व अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. यू. म. पठाण, प्राचार्य भगवंतराव देशमुख, लोकसाहित्याचे थोर अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे, ग्रामीण साहित्याची धुरा वाहणारे नि 50 वर्षे लिहिते असणारे प्राचार्य रा. रं. बोराडे व त्यानंतर अनेक ग्रामीण साहित्यिकांना प्रेरक रहिलेले, अ. भा. साहित्य संमेलानाध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, थोर ग्रामीण कवी ना. धों. महानोर, प्राचार्य स. रा. गाडगीळ, इतिहासतज्ज्ञ तात्यासाहेब कानोले, महान समीक्षक व मराठी भाषेचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सुधीर रसाळ ही नावे प्रतीकात्मक घेतली
आहेत.
मराठवाडा प्रदेश हा प्राचीन मराठी साहित्याप्रमाणे आधुनिक साहित्य चळवळींचाही आधारस्तंभ नव्हे, तर उदयभूमी राहिलेला आहे. मग, ती ग्रामीण साहित्याची चळवळ असो की, लोकसाहित्य नि कलांची. राजारामबापू कदम गोंधळीसारखे विस्मयचकित करणारे कलावंत असो की शाहीर, मराठवाडा योगदानात आघाडीवर नि सरस राहत आला आहे. नव्या पिढीत तर कितीतरी नावे आपली नाममुद्रा कोरू शकले आहेत, हे खचितच भूषणास्पद आहे.
दलित साहित्य चळवळीचे केंद्रच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने मराठवाडा नि औरंगाबाद राहिलेले आहे. प्राचार्य डॉ. म. ना. वानखेडे , प्राचार्य म. भि. चिटणीस यांच्या प्रेरणेने दलित वाङ्मयाला धुमारे मराठवाड्यातच फुटले. 'आठवणींचे पक्षी'कार प्र. इ. सोनकांबळे, वामन निंबाळकर , प्रा. डॉ. यशवंत मनोहर , साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. रा. ग. जाधव , प्रा. सुखराम हिवराळे, प्राचार्य रायमाने, प्रा. जिल्ठे अशी कितीतरी साहित्यरत्ने उगवली नि बहरली. प्रारंभी अस्मिता नि नंतर प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या चिवट व एकाकी संपादनाखाली प्रसिद्ध पावलेले दलित साहित्याचे मुखपत्र 'अस्मितादर्श' मराठवाड्याचे बंडखोर व विद्रोही साहित्याचे अग्रदूत ठरले. भारतातील दलित नाट्य चळवळीचे आरंभस्थानही मराठवाडा राहिला. प्रा. म. भि. चिटणीस व प्रा. त्र्यंबक महाजन यांचे योगदान थोरच होते.
मराठवाडा हा म्हणूनच मराठी साहित्य नि संस्कृतीचे आगर आणि ग्रामीण व विद्रोही दलित साहित्य चळवळीची उदयभूमी राहिलेली आहे, हे मान्य करावे लागेल.
महाराष्ट्र व कर्नाटकदरम्यानच्या सीमाभागातील शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र असणारे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आघाडीचे साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यानिमित्ताने मराठवाड्याचे मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या उन्नयनात असणारे योगदान मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
– प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे