बीड : लग्न आणि धोका प्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी गजाआड | पुढारी

बीड : लग्न आणि धोका प्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी गजाआड

गेवराई,पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील एका नवरदेव मुलाची फसवणूक झाल्याचे काही दिवसापूर्वी समोर आले होते. 2 लाख घेतल्यानंतर नवरी मुलीने लग्नास होकार दिला होता. यानंतर नवरदेव मंडळीकडील स्वखर्चाने मोठ्या उत्साहात लग्न समारंभ देखील पार पाडला होता. मात्र लग्नाच्या आठ दिवसानंतर नवरी मुलगी निघून गेली ती परत आलीच नाही. त्यातच सदरील नवरी मुलीचा यापूर्वी विवाह झालेला असून तिला दोन अपत्य असल्याचे मुलाकडील मंडळींना कळल्याने त्यांना धक्काच बसला होता.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवच्या फिर्यादीवरून नवरी मुलीसह पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या लग्न आणि धोका प्रकरणातील मुख्य सुत्रधार रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) याला पोलिसांनी मंगळवारी रात्री गजाआड केले. आरोपीला बुधवारी (दि.20)सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले. दरम्यान नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख देत असाल तर लग्नासाठी सहमती आहे असे सांगितले. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख 60 हजार व 1 लाख 40 हजाराचा धनादेश दिल्यानंतर गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात 20 जुलै 2021 रोजी लग्न समारंभ पार पडला.

दरम्यान, धनादेश आठ दिवसांत वठताच नवरी मुलगी रेखा ही माहेरी जाते म्हणून गेली. यानंतर वेळोवेळी वेगवेगळे कारणे देत ती परत आलीच नाही. यानंतर काही दिवसांनी तिचा मोबाईल बंद झाला. तर तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य देखील असल्याचे नवरदेव मंडळींना कळताच त्यांना धक्काच बसला.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापडीया यांना संपर्क साधला होता. त्‍यावेळी त्‍याने दमदाटी करत, तुम्हाला काय करायचे ते करा, कोठे फिर्याद द्यायची ते करा म्हणत फोन कट केला. याप्रकरणी नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे याच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनिता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी (तिघे रा.जाधववाडी औरंगाबाद सिडको), रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) व विठ्ठल किसन पवार (रा.सावरखेडा, औरंगाबाद, गंगापूर) या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तर या प्रकरणातील मुख्य सुत्रधार रामकिसन जगन्नाथ तापडीया याला गेवराई पोलिसांनी मंगळवारी (दि.19) रात्री अटक केली. आणि बुधवारी (दि.20) सकाळी आरोपी तापडीया याला न्यायालयात हजर केले.

आरोपी मृदंगाचार्य तसेच भाजपाचा कार्यकर्ता

आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) हा सांप्रदायिक आहे. मृदंगाचार्य तसेच भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. तसेच अहमदनगर जिल्हा ज्येष्ठ कलावंत मानधन समितीवर सदस्य देखील आहे. दरम्यान आरोपी तापडीया यांनी यापुर्वी अशाप्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का? हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल.
आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून इतर चार आरोपीचा शोध सुरू आहे. बाकी सर्व आरोपी लवकरात लवकर पकडले जातील व इतर ठिकाणी असे कुणाला फसवले होते का या विषयी सविस्तर तपास सुरू आहे.

हेही वाचा  

Back to top button