अमरावती : अचलपूर ठाण्यात खासदार नवनीत राणांची ३ तास बैठक | पुढारी

अमरावती : अचलपूर ठाण्यात खासदार नवनीत राणांची ३ तास बैठक

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : झेंडा फडकविल्यानंतर झालेल्या हिंसाचारानंतर खासदार नवनीत राणा यांनी आज (दि.२०) अचलपूर पोलीस ठाण्यात तब्बल ३ तास मॅराथॉन बैठक घेतली. दोन्ही समुदायातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत सामाजिक शांतता, सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे नवनीत राणांनी आवाहन केले.

अचलपूर-परतवाडा येथे जातीय सलोखा व सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी. यासाठी खासदार राणा यांनी पुढाकार घेत पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी जुळ्या शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे व श्रमजीवी नागरिकांना संचारबंदीमुळे रोजगाराला मुकावे लागते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे पोलिसांनी व प्रशासनाने या घटकांचा व व्यापारी वर्गाचा विचार करून संचारबंदीत शिथिलता द्यावी. बाजार असल्याने लोकांना जीवनावश्यक वस्तू घेता याव्यात, म्हणून परवानगी द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

या दुर्दैवी घटनेला जे जबाबदार आहेत. अशा खऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी शोधून काढून त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई करावी. परंतु निर्दोष किंवा ज्यांचा या घटनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कुठलाही संबंध नाही. अशा निरपराध नागरिकांवर कुठलेही गुन्हे दाखल होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी. निर्दोष नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल झाले असतील. त्यांची नावे वगळण्यात यावी, अशी मागणी खासदार राणा यांनी केली. दरम्यान, दोन्ही समुदायाला शांती व संयम राखण्याचे आवाहन केल्याने व प्रशासनासोबत बैठक घेतल्याने नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button