नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंची अखेर बदली; जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंची अखेर बदली; जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : विविध आदेश काढून वादग्रस्त चर्चेत असणारे नाशिक शहराचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांनी मार्च महिन्यात स्वत:हून विनंती अर्ज करून अकार्यकारी पदावर नियुक्ती मागितली होती. त्यानंतर २० एप्रिलला गृहविभागाने राज्यातील १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पांडे यांचाही समावेश आहे. दीपक पांडे यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

मावळते पोलिस आयुक्त पांडे यांनी नाशिकचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक आदेश काढले. त्यात नो हेल्मेट नो पेट्रोल, हेल्मेट नसल्यास दोन तास समुपदेशन, लेखी परिक्षा घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे विना हेल्मेट चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोलपंपचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजी पसरली होती. त्याचप्रमाणे राजकीय पदाधिकाऱ्यांवर विनापरवानगी मोर्चे, आंदोलन, कार्यक्रम आयोजित केल्यास गुन्हे दाखल झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी होती.

सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रम घेताना पुर्वपरवानगी घ्यावी लागत असल्याने त्यांच्यातही नाराजी होती. दरम्यान, पांडे यांनी मार्च महिन्यातच शासनाकडे बदलीसाठी विनंती केली होती. खासगी कारणामुळे त्यांनी अकार्यकारी पदावर बदली मागितली होती. त्यानुसार त्यांची विनंती मान्य झाली असून त्यांना अद्याप नवीन पदभार सोपवलेला नसला तरी त्यांच्या जागी मुंबईतील व्ही. आय. पी. सुरक्षाचे पोलिस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती केली आहे. नाईकनवरे यांनी सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोनन्नती दिली आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news