बीड : लग्न लावून देत नसल्याने तरुणाकडून मुलीच्या वडिलांचा खून | पुढारी

बीड : लग्न लावून देत नसल्याने तरुणाकडून मुलीच्या वडिलांचा खून

गौतम बचुटे/केज : तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत का लावून देत नाही? म्हणून संबंधित आरोपी आणि त्याच्या मित्रांनी मोटरसायकलीवरून पाठलाग करत, जीवे मारण्याच्या उद्देशाने मुलीच्या वडिलांच्या  डोक्यात लोखंडी रॉड घातला. या घटनेतील जखमी रमेश नेहरकर यांचा लातूर येथे उपचारादरम्यानच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी अद्यापही फरारी असल्याने पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

या बाबतची माहिती अशी की, तांबवा येथील भागवत चाटे हा युवक १७ वर्ष वयाच्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत का लावून देत नाही, या कारणावरून गेले कित्येक दिवस मुलीच्या वडिलांशी हुज्जत घालत होता. मुलीचे वडील रमेश नेहरकर (वय ४५ ) हे साने गुरुजी या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वस्तीगृहाचे सेवक म्हणून होते.

रमेश नेहरकर हे त्यांच्या मोटरसायकलवरून क्र. (एम एच -४४/एफ-४८३२) कळंबकडून केजकडे (केज-कळंब महामार्ग) येत होते. शनिवारी (दि. ९) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका डिस्कव्हर मोटरसायकलवरून आलेल्या भागवत चाटे व इतर दोघांनी त्यांचा पाठलाग केला. या महामार्गावरील फरीद बाबा दर्गा आणि संत सेना महाराज मंदिराच्यादरम्यान हल्लेखोरांनी चालत्या गाडीवरील रमेश नेहरकर याच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच हल्ला करत, हल्लेखोर केजच्या दिशेने फरार झाले होते. जखमी रमेश नेहरकर यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याना पुन्हा लातूर येथे हलविण्यात आले होते. दरम्यान सोमवारी (दि.११) लातूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

रमेश नेहरकरची पत्नी पुष्पा नेहरकर यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात भागवत चाटे आणि दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

काय आहे प्रकरण ?

मयत रमेश नेहरकर यांच्या मुलीचा फोटो आरोपी भागवत चाटे याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याचा जाब रमेश नेहरकर याने भागवत चाटे यास विचारला असता, भागवत त्यांना म्हणाला की, तुमच्या मुलीचे लग्न जर त्याच्यासोबत लावून दिले नाही, तर तुमचा खून करीन. अशी धमकी आरोपीने दिली होती. त्याच रागातून भागवत चाटे याने रमेश नेहरकर याचा खून केला असल्याचे समोर आले आहे.

 हेही वाचलत का ?

Back to top button