अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळेच राहिले असते. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कुणीही केला असता तर ते शक्य झाले नसते. कोणीही कितीही मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथे केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ५७ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
दरम्यान, केंद्र सरकारकडून देशाच्या ऐक्याला सुरुंग लावण्याचे काम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी अमरावती येथील विभागीय पदाधिकारी मेळाव्यात रविवारी (१० एप्रिल) संबोधित केले. राज्यकर्तेच या दिशेने जात असतील तर अधिक चिंतेची स्थिती आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी देशातील एका विचाराच्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली. जाती-जाती, धर्मा-धर्मात, भाषा-भाषेत जर कोणी वाद निर्माण करीत असेल तर त्या विरोधात राष्ट्रवादी संर्घषासाठी तयार राहणार असल्याचे पवार म्हणाले.
राजकारण असो वा जीवन संकटे येतात. संकटांना तोंड देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मुंबई येथील दंगलीच्या वेळी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून शांत केलेली मुंबई त्याचप्रमाणे लातूरच्या भूकंपाच्या संकटात लाखो लोकांचे पुन्हा उभे केलेले आयुष्य आदी संकटाचा सामना केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
संकटांना तोंड द्यायचे असते, त्यांना घाबरायचे नसते, असे पवार म्हणाले. याचवेळी देशात राज्यकर्त्यांकडून निर्माण केले जात असलेले असेच संकट घोंगावत असल्याचा इशारा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिला. हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करुन देशाचे ऐक्य धोक्यात आणण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे पवार म्हणाले.
कमी संख्येने असलेला हिंदू काश्मीरमध्ये राहत असताना दहशतवाद्यांनी हल्ले केले. त्यात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूवर अत्याचार झाले. तेथे मोठा समाज मुस्लिम होता. अलीकडे एका गृहस्थाने यावर सिनेमा काढला आहे. त्यात हिंदूवर अत्याचार कसे होतात असे दाखवित देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. हा सिनेमा बघितलाच पाहिजे असे चित्र केंद्रातील राज्यकर्त्यांनी निर्माण केले. मात्र काश्मीरमध्ये हल्ले झाले त्यावेळेस देशात व्ही. पी. सिंगांचे सरकार होते. भारतीय जनता पक्षाचा सरकारला पाठिंबा होता. सत्ता असताना घडलेल्या हल्लाची जबाबदारी भाजपाला टाळता येणार नाही, असे पवार म्हणाले.
इंधनाचे दर वाढले आहे, इंधनामुळे सर्व गोष्टींचे दर वाढले आहे. त्याची किंमत सर्वांना मोजावी लागत आहे. ४५ पार गेल्यानंतर देखील नोकरी मिळत नाही. केंद्रात सत्ता असताना राज्य सरकारांना मदत करण्याची भूमिका नाही. उलट राज्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपकडून होत आहे. सर्व सामन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे. त्याकरिता समान विचारांने एकत्रित येत केंद्र सरकार विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.
ईडी प्रकरणात फसविण्यात आलेल्या अनिल देशमुख यांना मुक्त करण्यासाठी आमिष दाखविले जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकार विरोधात बोलण्याकरिता आमिष दाखविले जात आहे. मात्र, कारागृहात राहणे पसंत करेल, मात्र, खोटे बोलणार नाही, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट सांगितले. शिवाय राष्ट्रवादीने विदर्भावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे पाटील म्हणाले.