

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची घरासमोर दिवसाढवळ्या गोळीबार करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे शहरातील काही व्यापारी, डॉक्टर, राजकीय पुढाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याची माहिती पोलिसांकडे असतानाही बियाणी यांची निर्घृण हत्या होते, हे म्हणजे बिहारलाही लाजवेल, असे हत्याकांड आहे.
या घटनेवरुन नांदेडमध्ये गुंडाराज सुरु असल्याचे दिसून येत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी दिली आहे. यापूर्वीही माझ्या मित्रमंडळातील काही जणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. नांदेडमध्ये सुरु असलेल्या गुंडाराजमुळे मी माझ्या जीवलग मित्राला गमवले असल्याचेही ते म्हणाले. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी केली आहे.