सुधीर मुनगंटीवार : ‘शिवसेनेनं बेईमानी केली, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कटूता नाही’ | पुढारी

सुधीर मुनगंटीवार : 'शिवसेनेनं बेईमानी केली, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कटूता नाही'

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय पतंगबाजी सुरु झाली आहे. उभय नेत्यांमध्ये तब्बल २५ मिनिटे पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. या भेटीमध्ये केद्रीय तपास यंत्रणांकडून जो काही सपाटा सुरु आहे त्यावरून चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ईडीचे धाडसत्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.

काल शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही संपत्ती आता ईडीने जप्त केल्याने आता सेना भाजपमधील संघर्ष आता आणखी उफाळणार आहे. दरम्यान, शरद पवार यांनी घेतलेली मोदींची भेट निव्वळ योगायोग असू शकत नाही. दिल्लीत झालेल्या भेटीनंतर आता राज्यात त्या भेटीवरून कयास लावले जात आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हळूच पुडी सोडताना शिवसेनेशी कटूता असली, तरी राष्ट्रवादीशी नाही असे सांगत चर्चेला अधिक वाव मिळेल याची काळजी घेतली. वैचारिक मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी भेटीवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांचे मत वैयक्तिक असल्याचे सांगितले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवार डॅमेज कंट्र्रोल करण्यात पटाईत असल्याचा टोला लगावला आहे. ईडीच्या कारवाईनेच भेट झाली असेल ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले मला भेटीची माहिती नाही

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीवर अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले. जोपर्यंत जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत बोलणं उचित नसल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान आणि एका पक्षाचे राष्ट्रीय नेते विकासकामांवर भेट घेऊन चर्चा करू शकतात. महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झालेली असू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

पवारांच्या स्नेहभोजनास नितीन गडकरींची उपस्थिती

देशातील राजकारणातील तीन दिग्गज नेते मंगळवारी संध्याकाळी एकाच ठिकाणी एकत्रित आले. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोज कार्यक्रमाला हजेरी लावली.दोन दिवसीय संसदीय कार्यप्रणाली संदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेसाठी राज्यातील आमदार राजधानीत आहेत.
यानिमित्त पवारांकडून सर्वपक्षीय आमदारांसाठी स्नेहभोज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील या कार्यक्रमाकरीता पवारांकडून आमंत्रित करण्यात आले होते.विशेष म्हणजे मुंबईतील मालमत्ते वर ईडी कडून करण्यात आलेल्या कारवाई नंतर संजय राऊत पहिल्यांदाच शरद पवार यांच्या घरी पोहोचले होते.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी च्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच आमदार अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे,संग्राम थोपटे उपस्थित होते.
हे ही वाचलं का ?

Back to top button