परभणी : पतीने घेतला गळफास तर पलंगावर पत्नीचा मृतदेह आढळला | पुढारी

परभणी : पतीने घेतला गळफास तर पलंगावर पत्नीचा मृतदेह आढळला

सेलू (परभणी) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील राजीव गांधी नगर येथे सोमवारी (दि. २८) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एकाच घरात पती व पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. अर्जून गणेश आवटे (वय ३२) व प्रियंका अर्जून आवटे (वय 28) अशी या पती-पत्नीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, व्यवसायाने रिक्षाचालक असलेला अर्जुन गणेश आवटे हा पत्नी प्रियंकासह राजीव गांधी नगरात वास्तव्यास होता. ३ वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. रविवारी रात्री जेवणानंतर हे दाम्पत्य घरातील एका खोलीत झोपले होते. सोमवारी सकाळी ७ वाजले तरी दोघेही खोलीच्या बाहेर न आल्याने अर्जुनच्या बहिणीने दरवाजा ठोठावला. मात्र तरीही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटूंबीय अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने दरवाजा तोडून पाहिला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले.

अर्जुनने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेला तर प्रियंकाही मृतावस्थेत पलंगावर आढळून आल्याने कुटूंबीय हादरून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळाची भेट देऊन पंचनामा केला.

Back to top button