IPL 2022 : विजय मिळूनही दिल्ली कॅपिटल्ससाठी वाईट बातमी! | पुढारी

IPL 2022 : विजय मिळूनही दिल्ली कॅपिटल्ससाठी वाईट बातमी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ (IPL 2022) ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुस-या दिवशी दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयामुळे स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेची चांगली सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचनेही मार्शच्या दुखापतीला दुजोरा दिला.

मिचेल मार्शला पाठीची दुखापत झाली असल्याचे समजते आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो, असे तत्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मार्श आयपीएलच्या (IPL 2022) पूर्वार्धात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने मार्शच्या दुखापतीला दुजोरा देताना सांगितले की, ‘मार्शला स्कॅनसाठी पाठवण्यात आले आहे. त्याला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली होती. त्याला ज्या प्रकारच्या वेदना जाणवत होत्या त्यावरून दुखापत गंभीर असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका आणि एकमेव टी २० सामना खेळण्यास असमर्थ आहे. तसेच तसेच आयपीएलमध्येही तो सहभागी होऊ शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे,’ असे फिचने व्यक्त केले आहे.

मार्शला आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ६.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौ-यावर असून भारतातही आयपीएलची धमाकेदार सुरुवात झाली आहे. अशातच मार्शला दुखापतीने गाठले असून तो आयपीएलसाठी उपलब्ध होईल की नाही याबाबत वैद्यकीय अहवालानंतरच कळेल. मार्शची दुखापत गंभीर असल्यास ती बरी होण्यासाठी ६ आठवडे लागू शकतात. अशा परिस्थितीत मार्शची अनुपस्थिती दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा झटका ठरू शकते.

दरम्यान, वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि मुस्तफिझूर रहमान दक्षिण आफ्रिका-बांगलादेश मालिकेचे भाग होते. ते दोघेही आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत पोहचले असून पहिल्या सामन्यादरम्यान त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. दिल्लीचा पुढील सामना २ एप्रिलला आहे. त्या सामन्यात हे दोन्ही गोलंदाज प्लेईंग इलेव्हनमध्ये असतील अशी शक्यता आहे. (IPL 2022)

Back to top button