

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : लोणावळ्याजवळील कातळधर याठिकाणी रविवारच्या सुट्टीनिमित्त फिरायला गेलेल्या अकरा जणांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते सर्वजण जखमी झाले. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रने मदत करीत या सर्वांना लोणावळ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी, चिंचवड, रावेत आणि भोसरी या भागात राहणारे काही तरुण, तरुणी लोणावळा आणि राजमाची किल्ला या मार्गावर घनदाट जंगल आणि खोल दरीमध्ये असलेल्या कातळधर याठिकाणी रविवारी (दि.27) सकाळी नऊच्या सुमारास फिरायला गेले होते.
या तरुणांपैकी कोणीतरी ओढत असलेल्या सिगारेटच्या धुरामुळे पोळावरील मधमाश्या उठल्या आणि त्यांनी या सर्वांवर हल्ला केला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
शंतनू देवळेकर, शारदा पवार, युवराज सिंग, संपदा पोकळे, खुशबू लोंढे, कमलेश इंगळे, ऋत्विक चव्हाण, वैभव इनामदार, निलेश वांद्रे, प्रशांत शृंगारे, अभिजित आहिरे अशी या जखमींची नावे आहेत.
घटना घडल्यावर जखमींपैकी एकाने पोलिस मदत केंद्राला फोन केला. तेथून लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र संघटनेला कॉल गेला. त्यानुसार शिवदुर्ग मित्र व वन्यजीव रक्षक पथकातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत या जखमींना वाचवले व लोणावळ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.