हातकणंगले : आ. राजू आवळे यांच्या मतदारसंघात २ वर्षांत ७० कोटींची विकासकामे | पुढारी

हातकणंगले : आ. राजू आवळे यांच्या मतदारसंघात २ वर्षांत ७० कोटींची विकासकामे

हातकणंगले : पोपटराव वाकसे

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी प्रणीत काँग्रेसचे आ. राजू आवळे यांनी दोन वर्षांत 70 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. समाजाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच किणी हद्दीत 30 कोटींचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा पराभव करून काँग्रेसचे राजू आवळे यांनी हातकणंगले मतदार संघातील जनतेच्या विकासाचा जोखड खांद्यावर घेतला. वडील माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या

मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये मतदारसंघातील मतदारांशी व्यक्तिगत संपर्क ठेवला आहे. रस्ते, पाणी या प्राथमिक गरजांबरोबर गावातील मुख्य रस्ते, पाणंदी पूर्ण करून शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पूर्ण केला आहे. याशिवाय मंदिरांनाही निधी देऊन आवळे यांनी धार्मिक कार्य केल्याची भावना मतदारसंघात निर्माण झाली आहे.

भयंकर अशा कोव्हिड काळामध्ये सर्वसामान्य जनतेची सोय व्हावी, याकरिता हातकणंगले, पेठवडगाव व संजय घोडावत विद्यापीठ या ठिकाणी सुरू असलेल्या कोव्हिड सेंटरना दीड कोटीचे साहित्य दिले. यामध्ये ऑक्सिजन सेट, औषधे, विविध प्रकारची उपकरणे याचा समावेश आहे. या कालावधीमध्ये कोव्हिड सेंटर्सना भेटी देऊन रुग्णांची विचारपूस करून आपलेपणा जपला आहे. कोल्हापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरपासून कराडपर्यंत महामार्गावर अपघात झालेल्या रुग्णांची सोय व्हावी, या हेतूने किणी (ता. हातकणंगले) येथे तीस कोटी रुपये निधीचे प्रशस्त ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे. महामार्गानजीक होत असलेल्या या रुग्णालयाकरिता 91लाख मिळाले असून लवकरच बांधकामास सुरुवात होणार आहे. या सर्व सोयींनी युक्त ग्रामीण रुग्णालयामुळे महामार्गावर होणार्‍या अपघातांतील जखमींना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.

केवळ दोन वर्षांमध्ये सत्तर कोटी रुपयांचा विकास मतदारसंघामध्ये केला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनास बांधील राहून उर्वरित तीन वर्षांच्या कालावधीमध्ये मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला न्याय देणार, तसेच शासनाच्या विविध योजना मतदारसंघातील मतदारांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचविण्यास वचनबद्ध असल्याचेही आ. राजू आवळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button