कोल्हापूर : आमदार विनय कोरेंनी अशक्य ते शक्य करून दाखवलं ! | पुढारी

कोल्हापूर : आमदार विनय कोरेंनी अशक्य ते शक्य करून दाखवलं !

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली. गेल्यावेळी एवढी चुरस नसली, तरी कोणतीही निवडणूक म्हटली की, कमी-अधिक प्रमाणात चुरस ही असतेच, ती होतीच. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांच्याविरोेधात कोण लढणार? याची चर्चा होती.

पाटील व महाडिक या घराण्यांतील राजकीय वर्चस्वाची लढाई पाहता भाजपने माजी आमदार अमल महाडिक यांना रिंगणात उतरविले. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार नेहमी उशिराने अगदी शेवटच्या दिवशी ठरत असतो. या निवडणुकीत सत्ताधार्‍यांचा उमेदवार ठरला; मात्र विरोधकांचा उमेदवार ठरत नव्हता. ठरला तेव्हा काहीसा उशीर झाला. कारण, या मतदारसंघात मर्यादित मतदारांशी संपर्क साधण्यात सत्ताधारी आमदारांना बर्‍याच अंशी यश आले होते.

सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यात चुरस होती. त्यांच्यात लढत व्हावी, असे मानणारा वर्ग राजकीय वर्तुळात सक्रिय होता; त्याचवेळी विरोधी उमेदवाराच्या माघारीसाठी पडद्यामागे हालचाली सुरू होत्या.

पाटील व महाडिक यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत माघारीसाठी महाडिक यांची समजूत कोण घालणार, असा प्रश्न होता. हे अवघड वाटणारे काम जनसुराज्य शक्ती पक्षाने केले. या पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि प्रा. जयंत पाटील हे यामध्ये आघाडीवर राहिले. पूर्वीच्या अनुभवाच्या शिदोरीवर कोरे यांच्या सहकार्याने कदम यांनी वरवर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखविली.

विनय कोरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली. महापालिकेच्या राजकारणात काय करावे लागते आणि कसे कसे सोसावे लागते, याचा अनुभव त्यांनी घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोधच झाली पाहिजे, यासाठी आमदार विनय कोरे कमालीचे आग्रही होते. महाविकास आघाडी व भाजप या दोन्ही ठिकाणी त्यांचे चांगले संबंध असल्याने कोरे यांनी ताकद पणाला लावली. दिल्लीतील आपल्या व्यापक संपर्काचा त्यांनी उपयोग करून घेतला.

हे सारे प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी त्यांनी समीत कदम या आपल्या सहकार्‍याला निरनिराळ्या नेत्यांकडे पाठविले. अशक्य ते शक्य करून दाखवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. प्रत्येक पातळीवर कोणत्याच नेत्याला स्वत: जाणे शक्य नसते, त्यासाठी गुपचूप कामगिरी पार पाडणारे विश्वासू सहकारी हाताशी लागतात. या सगळ्या कामात समीत कदम यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील तसेच सतेज पाटील व अमल महाडिक यांच्याशी चर्चेच्या अनेक फेर्‍या करण्यापासून ते सारे घडवून आणेपर्यंत जबाबदारी निभावली. अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि हे सारे घडविण्यात रात्रीचा दिवस करणार्‍या शिलेदारांचा जीव भांड्यात
पडला.

हेही वाचा

Back to top button