Stock market : आभासी गुंतवणुकीचा मोह टाळणे हिताचे! | पुढारी

Stock market : आभासी गुंतवणुकीचा मोह टाळणे हिताचे!

गेल्या आठवड्यात गुरुवारी 25 नोव्हेंबरला (Stock market) निर्देशांक 58795 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 17536 अंकांवर स्थिरावला. काही दिवसांपूर्वी तो 62 हजारांपर्यंत गेला होता. त्यानंतर आता त्याने थोडी विश्रांती घेतली आहे.

केंद्र सरकार संसदेत खासगी आभासी चलनावर नियंत्रण आणण्याचा विचार करत आहे. आभासी चलनात काही द्रव्यलाभ होण्याची शक्यता दिसल्यामुळे मोहाला बळी पडून अनेक गुंतवणूकदार या कांचनमृगाचा पाठलाग करत असतात. सर्व सामान्यांनी त्याच्या पाठीमागे मुळीच धावू नये. आपली बचत भविष्यकाळात उपयोगी पडावी म्हणून अनेक निवेशक गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारत असले तरी त्यांनी आपली गुंतवणूक ज्ञातस्रोतामध्येच करायला हवी. क्षणिक मोह हा कधीही वाईटच असतो. सध्या आभासी गुंतवणुकीचा मोह लक्षावधी लोकांना होत आहे.

तीन-चार दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी कृषिविषयक 3 कायदे मागे घेण्याची घोषणा केली. लुधियानाजवळ शेतकर्‍यांचा प्रचंड मोठा समुदाय सरकारच्या विरुद्ध उभा राहिला होता. त्यामुळे पंतप्रधानांनी आपली याबाबतची आग्रही भूमिका सोडली, हे देशहिताच्या द़ृष्टीने चांगले झाले. शेअरबाजारही अशा तात्कालिक गोष्टींकडे सर्वसामान्यपणे दुर्लक्षच करत असतो.

देशाची अर्थव्यवस्था आता दिवसेंदिवस भक्कम होत आहे. रोजगार सतत वाढत आहे. महागाई हळूहळू आटोक्यात येत चालली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र दोन महिन्यांनी 1 फेब्रुवारीला नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाईल, तेव्हा स्पष्ट होईल. तत्पूर्वी एक-दोन दिवस आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) संसदेसमोर मांडले जाईल.

‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने’च्या सभासदांच्या संख्येत (EPFO) सप्टेंबर 2021 मध्ये 15.41 लाख जाणांची भर पडल्याचे दिसून आले आहे. यंदा ऑगस्ट 2021 च्या तुलनेत सभासद संख्येत ही वाढ 13 टक्क्यांनी झाली आहे.

शेअरबाजारात (Stock market) आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार होत असल्याने त्यात अचूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मालकी हक्कांची नोंद ठेवणे व हस्तांतरण करणे सोपे झाले आहे.

इंधनाच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार आपत्कालीन वापरासाठीच्या साठ्यातून (स्टॅ्रटेजिक ऑईल रिझर्व्ह) 50 लाख बॅरल कच्चा तेलाचा वापर करणार आहे.

गेल्या आठवड्यात शेअरबाजारात (Stock market) जी घसरण दिसली त्याला ‘पेटीएम’ कारणीभूत होती. पेटीएममध्ये केलेल्या गुंतवणुकीत खूप फायदा होईल, अशा आशेने ज्यांनी हे समभाग घेतले होते त्यांना जवळजवळ 16 टक्क्यांचा फटका बसला आहे. पेटीएमचा समभाग शेअरबाजारात ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ या नावाने नोंदला गेला आहे.

पेटीएमचा सध्याचा 1300 रुपयांच्या जवळपास भाव अजूनही घसरू शकेल. त्यामुळे निवेशकांनी सावधानता बाळगायला हवी. नव्या नोकरीत रुजू झाल्यानंतर पहिल्या नोकरीत जमा झालेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी दुसर्‍या कंपनीच्या खात्यात हस्तांतर करणे आवश्यक असते. आतापर्यंत ही प्रक्रिया कर्मचार्‍यांना त्रायदायक व वेळ लागणारी होती.

पण, आता नोकरी बदलल्यावर पहिल्या ठिकाणची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम नव्या नोकरीच्या ठिकाणी सुलभपणे हस्तांतरीत होणार आहे. त्यासाठी ‘सी-डॅक’ने नवी सोपी प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीला आता कर्मचारी संघटनांनीही मान्यता दिली आहे. आतापर्यंत नोकरी बदल्यावर नव्या नोकरीच्या जागीही भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडले जायचे. त्यामुळे दुहेरी खाती उघडली जात असत. नव्या प्रणालीमुळे मात्र असे होणार नाही.

‘फोर-जी’ तंत्रज्ञानानंतर देश ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञानाची वाट पाहत असताना केंद्र सरकार मात्र एकदम ‘सिक्स-जी’ तंत्रज्ञानाकडे हनुमान उडी घेण्याचा बेत करत आहे. येणारे ‘सिक्स-जी’ तंत्रज्ञान भारतातच विकसित होणार आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीतच हे तंत्रज्ञान येईल. ‘भारती एअरटेल’ने नोकियाच्या भागीदारीत 700 मेगाहर्टस स्पेक्ट्रम बँडवर चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. या भारती एअरटेलबद्दलच पुढील परिच्छेदात ‘चकाकता हिरा’ म्हणून माहिती दिली आहे. (Stock market)

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button