कोल्‍हापूर : घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू | पुढारी

कोल्‍हापूर : घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे नांदणी परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

नांदणी येथे जयसिंगपूर मार्गावर पलसे कुटुंबीय राहते. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तिची आई जेवण करत होती, तर वडील विशाल घराच्या दारात बसले होते. या दरम्यान, मयुरेश खेळत असताना घरात पडलेला लिंबू त्याने तोंडात घातला आणि तो त्याच्या घशात अडकला.

पालकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्याला तत्काळ गावातील दवाखान्यात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी जयसिंगपूर येथे नेण्यास सांगितले. नंतर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र घशात लिंबू अडकून श्‍वास गुदमरल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

शिंगणापूर येथे पोत्यात आढळले मृत अर्भक

शिंगणापूर ; पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील शिंगणापूर पैकी माळवाडी येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास पुरुष जातीचे मृत अर्भक पोत्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक एक ते दोन दिवसांचे असून, पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे.

शिंगणापूर पैकी माळवाडी परिसरामध्ये एका रिकाम्या शेतामध्ये लहान मुले खेळत होती. त्यांना एका पोत्यामध्ये मृत अर्भक आढळून आले. मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. साधारणतः एक ते दोन दिवसांचे हे अर्भक असून, कुत्र्याने ते निम्मे खाऊन टाकले आहे. याबाबत करवीर पोलिसांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत अर्भक ताब्यात घेतले. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मले असावे का? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button