कोल्हापूर : सत्तारूढ आघाडीचे जि.प. सदस्य आजपासून सहलीवर | पुढारी

कोल्हापूर : सत्तारूढ आघाडीचे जि.प. सदस्य आजपासून सहलीवर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे. भेटीगाठी व अर्थपूर्ण चर्चेनंतर संपर्कात आलेल्या मतदारांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन झाले आहे. जिल्हा परिषदेतील सत्तारूढ आघाडीचे सदस्य मंगळवारी (दि. 23) सहलीवर रवाना होणार आहेत. त्यासाठी सोमवारी या सर्वांना कोल्हापुरातील विविध हॉटेलवर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देशांतर्गत कोठेही मतदारांना पाठविले जायचे. परंतु यावेळी कोरोनाचे सावट असल्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मतदारांना आणण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून सहलीची ठिकाणे गोवा महाराष्ट्रातच निश्चित करण्यात आली आहेत.

निवडणूक अठरा-वीस दिवसांवर आली आहे. अशी परिस्थिती असताना काही मतदारांचे फोन नॉट रिचेबल आहेत. त्यांची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सर्व मतदारांना मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्या संपर्कात ठेवण्यासाठी उमेदवारांनी सहलीचे नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने या सदस्यांना सहलीवर पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे.

दि. 18 नोव्हेंबरला आघाडीच्या सदस्यांची बैठक घेऊन नेत्यांनी सहलीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून सहलीचे नियोजन सुरू होते. सत्तारूढ आघाडीचे कारभारी सर्व सदस्यांच्या घरी जाऊन सहलीसाठी त्यांना तयार करत होते. पहिल्या टप्प्यात साधारणपणे 22 सदस्य सहलीला जाण्यास तयार झाले असल्याचे समजते. त्यांसाठी त्यांना कोल्हापुरातील विविध हॉटेलवर मुक्कामासाठी सोमवारी ठेवण्यात आल्याची चर्चा होती.

बॅगा भरून सदस्य तयार

सहलीकरिता गोव्यासह अलिबाग, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग अशी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय वेगळ्या ठिकाणी कोणाला जायचे असेल तर तशी व्यवस्थाही केली आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी सदस्य बॅगा भरून तयार असल्याचे बोलले जात आहे.

  • पहिल्या टप्प्यात 22 सदस्यांचा समावेश
  • सहलीची ठिकाणे गोवा, महाराष्ट्र

हेही वाचलं का?

Back to top button