कोल्हापूर : पाचगावात घरफोडी; 27 तोळ्यांचे दागिने चोरले | पुढारी

कोल्हापूर : पाचगावात घरफोडी; 27 तोळ्यांचे दागिने चोरले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पाचगाव (ता. करवीर) येथील रायगड कॉलनीतील बांधकाम व्यावसायिक संदीप हरी फराकटे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी 27 तोळे दागिने, 50 हजारांची रोकड असा 11 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीला आला. मध्यवर्ती व गजबजलेल्या कॉलनीत ही घटना घडल्याने चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. सराईत टोळीने पाळत ठेवून चोरी केली असावी, असा संशय काकडे, करवीरचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी व्यक्त केला. पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.
फराकटे हे मित्र नीलेश जाधवसमवेत शनिवारी (दि. 19) सकाळी गोव्याला गेले होते. तर पत्नी सोनाली, मुलगा हर्षदीप त्याच दिवशी दुपारी इचलकरंजी येथील माहेरी गेल्या होत्या.

या काळात घराला कुलूप होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून त्यामधील 27 तोळे सोन्याचे दागिने, 50 हजारांची रोकड असा 11 लाख 62 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. फराकटे दाम्पत्य पहाटे घराकडे परतले असता, हा प्रकार निदर्शनास आला. घरातील सर्व साहित्य विस्कटले होते. दागिन्यांचे बॉक्स बेडरूममध्ये इतरत्र टाकल्याचे दिसून आले.

  • 11.62 लाखांचा ऐवज लंपास
  • सराईत चोरट्यांचे कृत्य; पथके रवाना

हेही वाचलं का?

Back to top button