जलसंपदा मंत्री जयंत पाटील अडकले कलावंतीणीच्या कोड्यात  | पुढारी

जलसंपदा मंत्री जयंत पाटील अडकले कलावंतीणीच्या कोड्यात 

तासगाव; दिलीप जाधव

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे राजकारणात विरोधक व स्वकियांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिध्द आहेत. ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे कोडे जिल्ह्यातील जनतेला पडले आहे. पण स्वत: पालकमंत्री मात्र तासगाव -कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या मध्यवर्ती असलेल्या कलावंतीणीच्या कोड्यात अडकल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.

रविवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. मतदानाच्या आदल्या दिवशी कवठेमहांकाळ येथील बैठक संपवून ते तासगावककडे जात होते. बोरगावमार्गे जाताना त्यांच्या गाड्यांचा ताफा मळणगाव- मणेराजुरी गावांच्या शिवेवर असलेल्या कलावंतीणीच्या कोड्याजवळ थांबला.

गाडीतून उतरुन ते कोड्याजवळ गेले, कोडे नेमके काय आहे याची माहिती घेतली. सदरचे कोडे जवळपास पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मांडलेल्या दगडांच्या गोलाकार रचनेतून बाहेर पडणेच मुश्किल आहे, ही माहिती मिळताच पालकमंत्री पाटील यांनी सोबत असलेल्या लोकांना कलावंतीणीचे कोडे सुटते का बघण्यास सांगितले. काहीजणांनी तसा प्रयत्न केला पण ते त्यात अडकून पडले.

त्यांनाही ते कोडे सुटता सुटेना

बराच वेळ पालकमंत्री तेथे थांबले. अनेकांनी ते कलावंतीणीचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतू कुणालाच यश आले नाही. शेवटी हे कोडे काय सुटणार नाही याचा अंदाज येताच जयंत पाटील तासगावला रवाना झाले. दरम्यान या प्रकारानंतर जिल्ह्याला कोड्यात टाकणारे पालकमंत्री जयंत पाटील स्वत: कलावंतीणीच्या कोड्यात अडकले अशी चर्चा कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यात रंगली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button