Live सातारा जिल्हा बँक निवडणूक : धक्कादायक निकालांची नोंद | पुढारी

Live सातारा जिल्हा बँक निवडणूक : धक्कादायक निकालांची नोंद

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. बँकेवर राष्ट्रवादीची जरी सत्ता आली असली तरी ईश्वर चिठ्ठीद्वारे दोन विरोधकांनी बँकेत प्रवेश केला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. खटाव सोसायटीतून राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रभाकर घार्गे यांनी पक्षाचे उमेदवार नंदकुमार मोरे यांचा पराभव केला.

Live अपडेट्स…

 

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी तुफान डान्स केला. ओ शेठ तुम्ही नादच केला थेट.. या गाण्यावर शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा आनंद राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांनी चांगलाच लुटला.

राष्ट्रवादी कार्यालयावर तुफान दगडफेक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोरेगाव मधील काही युवकांनी सातारा शहरातील राष्ट्रवादी कार्यालयावर तुफान दगडफेक केली. संशयितांनी या निवडणुकीत पराभूत झालेले ‘आ. शशिकांत शिंदे यांचा विजय असो’ असे म्हणत दगडफेक केली. या घटनेमुळे साताऱ्यात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तोडफोड करणारे नेमके कोण याची चौकशी सुरू आहे.

शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या पाटण तालुका सोसायटी मतदारसंघात राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी त्यांच्यावर 14 मतांनी विजय मिळवला आहे

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यात आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. तर ज्ञानदेव रांजणे २५ मते घेऊन विजयी झाले आहेत.

नवीन अध्यायास प्रारंभ

सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत आठ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे सुपूत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. मागील सहा दशकांपासून एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या कराड तालुका सोसायटी गटात स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता नवीन अध्यायास प्रारंभ झाला आहे.

Back to top button