लग्नसराईमुळे विविध व्यवसायांत तेजी | पुढारी

लग्नसराईमुळे विविध व्यवसायांत तेजी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

तुळशी विवाहानंतर विवाहोच्छुकांची लगीनघाई सुरू झाली असून यानिमित्ताने बाजारपेठांनाही लग्नसराईचा साज चढतो आहे. लग्न समारंभाशी संबंधित अगदी हॉल, कॅटरिंगपासून ते देण्या-घेण्याच्या विविध भेटवस्तूंसाठी इलेक्ट्रॉनिक, फर्निचर तसेच सोने-चांदी खरेदीसाठी शहरासह गांधीनगर आदी ठिकाणच्या बाजारपेठांत गर्दी दिसून येत आहे. कोरोनामुळे रखडलेले अनेकांचे विवाह यंदा शुभ मूहुर्तावर मोठ्या धामधुमीत होणार असल्याने लग्नसराई संबंधित सगळ्याच क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल येत्या चार-पाच महिन्यांत होणार आहे.

कोरोनाच्या सावटामुळे मागील दीड – दोन वर्षापासून लग्नसराईला ब—ेक लागला होता. संसर्ग वाढू नये यासाठी सण उत्सवाप्रमाणे समारंभातही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घातले होते, त्यांची अमंलबजावणीही नागरिकांनी केली. मागील काही महिन्यांपासून लसीकरणाचा वाढता वेग आणि कोरोनाची कमी झालेली रूग्णसंख्या यामुळे यंदाच्या लग्नसराईत विवाह सोहळे थाटातच करण्याचे बेत अनेकांनी आखलेत. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेले विवाह मुहूर्त 9 जुलैपर्यंत असल्याने मंगलाष्टकांसह वाजंत्रींचा आवाज घुमणार आहे.

सध्याच्या विवाह सोहळ्यांना साखरपुडा, मुहुर्तमेढ, हळद, मेहंदी, संगीत, लग्न अशा विविध कार्यक्रमांची जोड मिळाली आहे. या प्रत्येक कार्यक्रमासाठी वधु-वरांसह प्रत्येकाला कपडे, त्यावर मॅचिंग दागिने हवे असतात. इतकेच नाही तर प्रत्येक समारंभासाठी विविध थीम्स ठेवण्यात येत असून त्यानुसार त्या-त्या कार्यक्रमासाठी हॉलची सजावट आणि जेवणाचा मेनूही वेगवेगळे ठरवले जातात. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बाजारपेठांत वधू-वरांकडील मंडळींची गर्दी पहायला मिळते आहे.

लग्नांचा ट्रेंड बदलला…

लग्नसराईसाठी सभागृह, लॉन, हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. सद्यस्थितीत लग्नाचा ट्रेंड बदलला असून लॉन, मोकळ्या जागेत सायंकाळी बहुतांश लग्नं उरकण्यात येतात. याठिकाणी विविध पदार्थांची रेलचेल असते. मोठ्या शहरातील शाही विवाहांची परंपरा ग्रामीण भागातही रूजत असून या ठिकाणी राबणार्‍यांना जणू सुगीचे दिवस आले आहेत.

हे ही वाचल का ?

 

पाहा व्हिडिओ : टाऊन हॉल : कोल्हापुरचं जगप्रसिद्ध वास्तूवैभव

 

 

Back to top button