सातारा जिल्हा बँक निवडणूक : ११.३० वाजेपर्यंत फैसला : दिग्गजांची वाढली धाकधूक | पुढारी

सातारा जिल्हा बँक निवडणूक : ११.३० वाजेपर्यंत फैसला : दिग्गजांची वाढली धाकधूक

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांची मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होत असून, तासाभरातच पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल जावली सोसायटी मतदारसंघाचा असणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 पर्यंतच सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हायव्होल्टेज लढती झालेल्या सोसायटी मतदारसंघात सहा जागांसह अन्य तीनही मतदारसंघांतील उमेदवारांची धाकधूक कमालीची वाढली आहे.

11 जागा बिनविरोध करत राष्ट्रवादीने वर्चस्व

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध करत राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवले आहे. 21 पैकी 11 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 10 जागांसाठी 20 जण उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 21 नोव्हेंबर रोजी 96.33 टक्के मतदारांनी आपला कौल मतपेटीतून दिला आहे. अत्यंत चुरशीने मतदान झाले असून जावलीत हमरीतुमरी, वादावादी झाली. अनेक मतदारसंघांत मतांची फुटाफुटीही झाली आहे. त्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. ज्या उमेदवारांना विजयाचा ठाम विश्वास आहे,

त्यांनी जल्लोषाचीही तयारी केली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ना. शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे या मातब्बरांच्या निकालाबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे. तर रामभाऊ लेंभे, प्रदीप विधाते, ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे यांच्या निकालाची फक्त औपचारिकता बाकी आहे.

मंगळवारी सकाळी 8 वाजता जरंडेश्वर नाक्याजवळील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या इमारतीतील सभागृहात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. ही मोजणी 11 टेबलवर होत आहेत. सर्व मतदारसंघातील मतमोजणीसाठी तालुकानिहाय विभागणी करण्यात येणार आहे. प्रारंभी सर्वच टेबलवर सोसायटी मतदारसंघामधील मतांची मोजदाद होणार आहे. तर यानंतर उर्वरित नागरी सहकारी बँका व पतसंस्था, इतर मागास प्रवर्ग व महिला प्रतिनिधी मतदारसंघातील मतांची मोजणी होणार आहे. यानंतर सर्व तालुक्यांची मते एकत्रित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

प्रत्यक्षात मतमोजणी 9 वाजताच सुरू होणार

प्रत्यक्षात मतमोजणी 9 वाजताच सुरू होणार असल्याने सोसायटी मतदारसंघाचा निकाल त्यानंतरच बाहेर पडणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेसाठीची मतमोजणीची प्रक्रिया 11.30 पर्यंत पूर्ण होणार असून जिल्हा बँकेत कोण कोण एन्ट्री करणार हे स्पष्ट होईल.
मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, सहाय्यक निवडणुक अधिकारी शंकर पाटील, जनार्दन शिंदे यांच्यासह 60 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील उर्वरित सर्व 10 जागांवर विजयाचा दावा केला आहे. मात्र, पक्षांतर्गत कुरघोडी आणि गाफीलपणा याचा फटका राष्ट्रवादीला बसणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

पोलिसांचा सर्वत्र हेवी बंदोबस्त

जरंडेश्वर नाका येथील नागरी सहकारी बँकेच्या इमारतीत मंगळवारी सातारा जिल्हा बँकेची मतमोजणी होणार आहे. तेथे सातारा पोलिस उपविभागातील शहर, शाहूपुरी, तालुका व बोरगाव पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. याठिकाणी उपविभागाचे 1 इन्चार्ज, 2 पो.नि., 3 स.पो.नि., 5 फौजदार व सुमारे 100 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. दरम्यान, ज्या तालुक्यांमध्ये सोसायटी मतदारसंघात निवडणूक लागली आहे तेथेही पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. जिल्ह्यात 4 स्ट्रायकिंग फोर्स, 3 आरसीपीच्या तुकड्या तैनात राहणार आहेत.

Back to top button