अजिंक्य रहाणेची कानपूरच्या ग्रीन पार्कवर लागणार ‘कसोटी’ | पुढारी

अजिंक्य रहाणेची कानपूरच्या ग्रीन पार्कवर लागणार ‘कसोटी’

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी ही कानपूरच्या ग्रीन पार्क ओव्हल येथे होणार असून, या सामन्यात अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. यावेळी खर्‍या अर्थाने अजिंक्यची ‘कसोटी’ असणार आहे.

अजिंक्यने कर्णधार म्हणून एकही सामना गमावला नसला तरीही फलंदाजीत त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. त्याला फलंदाजीत म्हणावा तसा सूर सापडत नाही. या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जर अजिंक्य साजेशी खेळी करू शकला नाही तर, कदाचित त्याची ही शेवटची कसोटी मालिका ठरू शकते.

गेल्या 15 कसोटीत खराब फॉर्म

अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म हा गेल्या 15 कसोटी सामन्यांपासून आहे. त्याने इतक्या कसोटी सामन्यांत 24.76 च्या सरासरीने 644 धावा केल्या आहेत. यामध्ये केवळ एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, 33 वर्षीय हा फलंदाज स्पिनर आणि जलदगती गोलंदाज दोन्ही विरुद्ध अडचणीत दिसला. त्यामुळे मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज फॉर्मात नसणे ही संघासाठीदेखील चिंतेची बाब आहे.

कर्णधार म्हणून अजिंक्यची कामगिरी भारताच्या पथ्यावर

भारताकडून अजिंक्यने आजवर पाच सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्यामधील चार सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला तर, एक सामना ड्रॉ राहिला. यासोबतच पाच सामन्यांत त्याने 320 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 112 होती. त्यामुळे अजिंक्यकडून कानपूर कसोटीतदेखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी भारतीय कसोटी संघातील काही खेळाडूंनी मुंबईमध्ये कसून सराव केला. त्यामध्ये अजिंक्यदेखील होता.

मायदेशातील परिस्थिती अजिंक्यच्या विरोधात

अजिंक्य रहाणे ची आजवरची क्रिकेट कारकीर्द पाहिल्यास त्याने घरच्या मैदानापेक्षा बाहेरील मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. घरात आजवर त्याने 31 कसोटी सामन्यांत 1605 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 4 शतके व 8 अर्धशतके झळकावली आहेत. देशाबाहेर त्याने 46 सामने खेळले असून, 3087 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 8 शतके व 16 अर्धशतके झळकावली आहेत.

कसोटी कारकीर्द

कसोटी सामने :78
धावा :4756
सर्वोत्तम खेळी :188
शतके :12
अर्धशतके :24

Back to top button