कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कामकाज लाक्षणिक संपामुळे ठप्प | पुढारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कामकाज लाक्षणिक संपामुळे ठप्प

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या वतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने दिवसभर विद्यापीठातील कामकाज ठप्प होते.

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाल्याने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये शुकशुकाट होता. कर्मचार्‍यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर एकत्र जमून प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे महासचिव मिलिंद भोसले यांनी लाक्षणिक संपाबद्दलची भूमिका विषद केली.

शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, ऑफिसर्स फोरम व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ संपात सहभागी झाला होता. आंदोलनात अतुल एतावडेकर, आनंद खामकर, संजय कुबल, राम तुपे, शशिकांत साळुंखे, विशांत भोसले, सुरेश पाटील, अजय आयरेकर, दिनेश उथळे, वर्षा माने, सुनीता यादव सहभागी झाले होते.

12 मागण्यांसाठी संप

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी, अधिकार्‍यांनी महत्त्वाच्या 12 मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यात 58 महिन्यांची थकबाकी विद्यापीठ कर्मचार्‍यांना मंजूर करणे, आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, उर्वरित पदांची सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना काढणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, पदोन्नतीमधील आरक्षण लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

पाहा व्हिडिओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं

Back to top button