निवृत्ती वेतनाआड येणार्‍या शुक्राचार्यांना आवरा! | पुढारी

निवृत्ती वेतनाआड येणार्‍या शुक्राचार्यांना आवरा!

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

शासकीय सेवेतून निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना निवृत्ती दिवशी निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी व ग्रॅच्युईटी या विषयीची सर्व कागदपत्रे पूर्ण करून त्याच्या हातात देण्याची प्रथा राज्यातील काही कार्यालयांनी सुरू केली आहे. तथापि, कोल्हापुरात मात्र अनेक कर्मचारी सेवाकाळ संपुष्टात येऊन दोन वर्षे उलटली, तरी अद्याप निवृत्ती वेतनापासून वंचित आहेत.

निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी या कर्मचार्‍यांवर आपल्याच कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. अशा कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वेतनाच्या फाईलवर ठाण मांडून बसलेल्या सरकारी शुक्राचार्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. अन्यथा निवृत्ती वेतनाचा लाभ न घेताच कर्मचार्‍यांवर जगाचा निरोप घेण्याची वेळ येऊ शकते.

शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये तर हा विषय अत्यंत गंभीर आहे. आरोग्य सेवेत काम करणार्‍या परिचारिका, वॉर्डबॉय यांनी आपला सेवेचा कालावधी सश्रम घालवूनही त्यांना निवृत्ती वेतनाची प्रतीक्षा आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात असे दोन वर्षे निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या परिचारिकांची संख्या 30 हून अधिक आहे.

या कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी परिचारिकांच्या संघटनेने काही दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना निवेदनही सादर केले. निवृत्ती वेतन अडकल्याने वाढत्या महागाईला तोंड देणेही अशक्य असल्याची व्यथा त्यांनी मांडली होती. संबंधित विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडे आपल्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी गेले असता, या विभागात कर्मचारी जागेवर उपस्थित नसतात, अशी तक्रारही त्यांनी केली. या कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ काय करणार, असा प्रश्न विचारला जातो आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत येणार्‍या हिवताप निर्मूलन कार्यालयामधील एका कर्मचार्‍याला अशाच निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत जगाचा निरोप घ्यावा लागल्याचे उदाहरण ताजे आहे. कोकणातील मूळ गावचा असलेला हा कर्मचारी कोरोनाच्या तोंडावर निवृत्त झाला होता. त्याने कोरोना काळातही निवृत्ती वेतनासाठी कार्यालयाचे हेलपाटे मारले आणि या दरम्यान त्याला कोरोना संसर्गाने गाठले होते. त्याच्या उपचारासाठी पैसे उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे खासगी दवाखान्याचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले.

अखेरीस सावंतवाडी येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना रोग बळावल्याने त्याला गोव्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले. यामध्येच त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने सेवानिवृत्तीचा लाभ घेण्यापूर्वीच त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर सेवानिवृत्तीसाठी सरकारी कर्मचार्‍यांचा सरकारी कार्यालयांकडून किती खेळखंडोबा सुरू आहे, याची कल्पना येऊ शकते.

पाहा व्हिडिओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं

Back to top button