Flood : कोल्हापुरात ७२ तासांपूर्वी लागेल महापुराची चाहूल | पुढारी

Flood : कोल्हापुरात ७२ तासांपूर्वी लागेल महापुराची चाहूल

कोल्हापूर/पुणे : पुढारी वृत्तसेवा

Flood कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा आणि भीमा या प्रमुख नद्यांसह अन्य नद्यांना येणार्‍या महापुराचे अनुमान 72 तास आधीच वर्तविणारी संगणकीय प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी ही कामगिरी केली आहे. या प्रतिकृतीला डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी-चिंचवड यांनी मान्यता दिली असून, लवकरच सावित्रीबाई फुले विद्यापीठाची त्याला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना महापुराचा फटका बसू लागला आहे. या महापुरांची पूर्वकल्पना देणारे कोणतेही तंत्रज्ञान आजपर्यंत विकसित झालेले नाही. त्यामुळे महापूर आला की, या भागातील नागरिकांचे, घरादारांचे, मालमत्तांचे आणि शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र, अभियंता हेमंत धुमाळ यांनी या नद्यांना येणार्‍या महापुराची किमान 72 तास आधी माहिती देणारी संगणकीय प्रतिकृतीच तयार केली आहे. या प्रतिकृतीमुळे महापुरामुळे होणारे नुकसान किमान काही प्रमाणात कमी होण्यास फार मोठा हातभार लागणार आहे.

2019 साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराची दखल संयुक्त राष्ट्र संघानेही (युनो) घेतली होती. भविष्यात या भागात अशा पद्धतीच्या महापुराची आपत्ती उद्भवल्यास त्याबाबतचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सूचना संयुक्त राष्ट्र संघाने जपानला केली होती. नैसर्गिक आपत्तींशी यशस्वी मुकाबला करण्याचा जपानचा दांडगा अनुभव विचारात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने जगभरातील नैसर्गिक आपत्तींचा धोका असलेल्या देशांसाठी अशा पद्धतीचा सुरक्षा आराखडा तयार करण्याची जबाबदारीही जपानवर सोपविलेली आहे. राज्यातील जलसंपदा विभागातील काही अधिकार्‍यांच्या सहकार्याने जपानमधील सुरक्षा आराखडानिर्मिती पथक महाराष्ट्रासाठी हा आराखडा तयार करून देणार होते. केंद्र शासनाने या पथकामध्ये विशेष अधिकारी म्हणून पुण्यातील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांची नियुक्ती केली होती.

जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर धुमाळ यांनी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत प्रदीर्घ संशोधन करून एक शोधनिबंध तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे या महापुराचा किमान 72 तास आधीच अचूक अंदाज वर्तविणारी एक संगणकीय प्रतिकृतीही तयार केली आहे. धुमाळ यांनी आपला हा शोधनिबंध आणि महापुराचा अचूक अंदाज वर्तविणारी संगणक प्रतिकृती पिंपरी-चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाला सादर केली आहे. या महाविद्यालयाने हा शोधनिबंध आणि महापुराचा अंदाज वर्तविणार्‍या प्रतिकृतीला मान्यता दिली आहे. लवकरच हा शोधनिबंध आणि प्रतिकृती अंतिम मान्यतेसाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाला सादर करण्यात येणार आहे.

या शोधनिबंधामध्ये कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी धरणांतील बॅकवॉटर, त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीवर होणारा परिणाम, त्याबाबत उपाययोजना, कृष्णा नदीची नागमोडी वळणे, संथ प्रवाह आणि त्याबाबत उपाययोजना आदी विषयांवर सखोल संशोधन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इथली पूरस्थिती टाळण्यासाठी काही बहुमोल मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा शोधनिबंध महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पूरस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाचा समजण्यात येत आहे.

या संशोधनासाठी धुमाळ यांना प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे, डॉ. श्रीनिवास लोंढे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. कुलकर्णी, डॉ. राधिका मेनन, डॉ. दीपा जोशी, डॉ. श्रुती वडाळकर यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे हेमंत धुमाळ यांनी सांगितले.

…असे काम करेल ही यंत्रणा! ( Flood )

पावसाळ्यात प्रत्येक भागातील पाऊसमान, धरणांतील आणि नद्यांतील पाणी पातळी, उर्ध्वभागातून सुरू असलेला विसर्ग, नद्यांची वहन क्षमता या सगळ्या माहितीची राज्यातील प्रत्येक तालुक्यातील जलसंपदा कार्यालयात प्रत्येक तासाला नोंद होईल. त्यावरून आगामी 72 तासांतील पूरस्थितीचे अनुमान लागेल. त्यानुसार ही सगळी माहिती शासनासह प्रत्येक तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस ठाणे यासह प्रत्येक ग्रामंचायतींपर्यंत पोहोचेल. त्या माहितीच्या आधारे कोणत्या भागात पूर येणार आहे, त्याचा अंदाज येईल. त्यानुसार प्रतिबंधात्मक आणि बचावात्मक उपाययोजना राबविणे शासन, प्रशासनासह सर्वांना सोयीचे ठरणार आहे.

…अशी लागेल महापुराची आगाऊ चाहूल! ( Flood )

महापुराची पूर्वकल्पना देणारी ही प्रतिकृती संपूर्णत: संगणकीय आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा, नद्यांची पाणी पातळी, धरणांमधून सुरू असलेला विसर्ग, धरणांच्या आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेले पावसाचे प्रमाण, प्रत्येक नदीची नैसर्गिक वहन क्षमता इत्यादी माहिती संगणकाद्वारे प्रत्येक तासाला या प्रतिकृतीत भरायची आहे. या माहितीनुसार, ही प्रतिकृती पुढील 72 तासांत कोणत्या भागात काय पूरस्थिती असेल, याचा अचूक अंदाज वर्तविणार आहे. या माहितीनुसार, त्या त्या भागातील लोकांना महापुराची पूर्वकल्पना येऊन खबरदारीच्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांसाठी हे मॉडेल उपयोगी ठरणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button