[toggle title="डॉ. अनिल मडके" state="open"][/toggle]
विविध कारखाने, गिरण्यांसारखी धूर ओकणारी ठिकाणे, पेट्रोल, डिझेलवर किंवा ज्वलनशील गॅसवर चालणारी वाहने यामुळे हवेचे प्रदूषण होते. प्रदूषणकारी कण नाकावाटे फुफ्फुसात (Healthy lungs) प्रवेश करतात आणि फुप्फुसातील सूक्ष्म श्वासवाहिन्या – वायुकोश यांचा दाह निर्माण करतात. यामुळे वायुकोशाच्या आकुंचन-प्रसरणावर परिणाम होतो. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते.
प्रदूषणाचे वारे म्हणजे कोरोनासारखी पसरणारी गोष्ट नाही. ती आपल्या बेजबाबदारपणाची गोष्ट आहे. वाहनांचा वाढता वापर, इंधनाची बेजबाबदार उधळपट्टी, कचर्याची विचित्र विल्हेवाट या आणि अशा अनेक वर्तणुकीमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. ते वाढत आहे आणि त्यामुळे आपल्या फुफ्फुसांवर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे आक्रमण होत आहे. 'दिवाळीच्या काळात फटाके उडवू नका' म्हणून अगदी घसा कोरडा होईस्तोवर ओरडून सांगितले तरी, तो आवाज फटाक्याच्या दणदणाटात कुठे विरला कुणास ठाऊक!
दिल्लीत प्रदूषणाची पातळी (AQI – Air Quality Index) तर 380 च्या घरात गेली आहे, जी गंभीर आहे. चारशेच्यावर ती अतिगंभीर असे समजले जाते. दिल्लीकरांसाठी आता प्रदूषणामुळे शाळाही एक आठवड्यासाठी बंद आहेत. गेल्यावर्षी दिल्लीकरांनी धूर, धुके आणि धुरके यांचा सामना करत कोरोनाला तोंड दिले. यावर्षी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी असली तरी प्रदूषणग्रस्तांची स्थिती फारशी चांगली नाही. हवेतील पारदर्शकता कमी झाली आहे. वायू प्रदूषणाची गंभीर पातळी केवळ दिल्लीपुरती मर्यादित राहिली नाही. भारतातल्या बहुतेक शहरांमध्ये वायू प्रदूषण वेगाने वाढत आहे.
वेगवेगळ्या प्रदूषकांमुळे आपल्या फुफ्फुसांवर हृदयावर (Healthy lungs) आणि एकंदर शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात आणि ते अक्षरशः जीवघेणे असतात, हे आता लक्षात घेणे आवश्यक आहे.
प्रदूषणाचा फटका सर्वांनाच बसणार आहे. यात शंका नाही; पण त्यातही दीर्घकालीन श्वसन विकाराने त्रस्त असणार्या उदा. दमा, क्रोनिक ब्राँकायटिस, सीओपीडी, आयएलडी आदी व्यक्तींना हवेच्या प्रदूषणामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा या वायू प्रदूषणामुळे होणारा एक महत्त्वाचा विकार म्हणजे सीओपीडी होय.
नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार म्हणजे यावर्षीचा 17 नोव्हेंबर हा दिवस जागतिक सीओपीडी दिन म्हणून, ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग्ज डिसीजेस (GOLD) या जागतिक संस्थेच्या वतीने इ.स. 2002 पासून जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे- "Healthy Lungs – Never More Important' म्हणजे निरोगी फुफ्फुसे – इतकी महत्त्वाची कधीच वाटत नव्हती!'
सीओपीडी हा दीर्घकाळ टिकणारा चिवट श्वसनविकार आहे. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज या विकाराच्या नावाची COPD ही आद्याक्षरे आहेत. दीर्घकाळ टिकणारा, श्वसनात अडथळा आणणारा फुप्फुसांचा विकार म्हणजे सीओपीडी.
जगभरात वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडणार्यांमध्ये सीओपीडीचा नंबर हा तिसरा लागतो. सीओपीडी आजही वेगाने वाढत आहे. कोणत्याही प्रकारचा धूर, विशेषतः सिगारेटचा धूर हा सीओपीडी चा प्रमुख कारणीभूत घटक आहे. विविध वायू-प्रदूषणकारी घटक उदा. सल्फर डायऑक्साईड, नायट्रेटस, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म घटक (पार्टिक्युलेट मॅटर्स – पीएम), लेड, हवेतील बाष्प कण आणि इतर कण (व्होलाटाईल कंपाऊंडस् ) अशा वेगवेगळ्या घातक घटकांमुळे सीओपीडीचा त्रास संभवतो.
ज्या व्यक्ती सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्का, गुडगुडी अशा नानाप्रकारे धूम्रपान करतात, त्या व्यक्तींना कालांतराने सीओपीडी होतोच; पण ज्या व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नाहीत; पण त्यांच्या आजूबाजूला धूम्रपान करणार्या व्यक्ती असतात त्यांनाही भविष्यात सीओपीडीचा धोका असतो. उदा. कुटुंबातील व्यक्ती धूम्रपान करत असेल तर हा धोका अधिक असतो. कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बंद जागा-थिएटर्स, मंडई, रेल्वे, बसस्थानक आदी ठिकाणी धूम्रपानामुळे तिथल्या निरोगी व्यक्तींना धोका संभवतो. (Healthy lungs)
विविध कारखाने, गिरण्यांसारखी धूर ओकणारी ठिकाणे, पेट्रोल, डिझेलवर किंवा ज्वलनशील गॅसवर चालणारी वाहने यामुळे हवेचे प्रदूषण होते. प्रदूषणकारी कण नाकावाटे फुफ्फुसात प्रवेश करतात आणि फुप्फुसातील सूक्ष्म श्वासवाहिन्या – वायुकोश यांचा दाह निर्माण करतात. यामुळे वायुकोशाच्या आकुंचन-प्रसरणावर परिणाम होतो. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. यालाच सीओपीडी म्हणतात.
प्रदूषित वातावरणात दीर्घकाळ राहणार्यांना तसेच भर चौकात किंवा वाहतुकीच्या रस्त्यांवर ज्यांची कार्यालये दुकाने किंवा घरे आहेत, उदरनिर्वाहासाठी, नोकरीसाठी, धंद्यासाठी ज्यांना रस्त्यावर आपला वेळ व्यतित करावा लागतो, अशा सर्वांना सीओपीडीचा धोका संभवतो. धूम्रपान करणार्या व्यक्ती, खाणकाम किंवा रस्त्याचे काम करणार्या व्यक्ती, निकृष्ट राहणीमान असणार्या व्यक्ती, ज्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष आहे, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे आणि क्षयरोग किंवा एचआयव्ही बाधित-एड्सग्रस्त व्यक्ती अशा सर्वांना सीओपीडीचा धोका असतो.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून जगभर कोरोनाविषाणूने थैमान घातले आहे. यातून अनेकांची सुटका झाली नाही. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांना कोरोनानंतर, 'पोस्ट कोव्हिड सिंड्रोम'ला सामोरे जावे लागले. ज्यांना सीओपीडीचा त्रास होता, त्यांना नंतरच्या समस्या अधिक तीव्रतेने जाणवल्या. थोडक्यात, सीओपीडी आणि कोव्हिड ही युती अभद्र आहे.
बाहेरच्या किंवा वातावरणातील हवेच्या प्रदूषणाबरोबर (आऊटडोअर पोल्युशन) घरातील प्रदूषण (इनडोअर पोल्युशन) हेदेखील सीओपीडीचे प्रमुख कारण आहे. ग्रामीण भागात इंधन म्हणून जिथे लाकूड किंवा शेण्या वापरल्या जातात, तिथला धूर तसेच विविध प्रकारचा कचरा जाळल्यानंतर होणारा धूर सीओपीडीला कारणीभूत ठरतो. थंडी सुरू झाली आहे; पण शेकोटी पेटवणे श्वसनासाठी धोक्याचे आहे. काही ठिकाणी डास होतात म्हणून धूर केला जातो, तोही सीओपीडीसाठी आमंत्रक असतो.
सीओपीडीचे निदान पल्मोनरी फंक्शन टेस्ट या चाचणीद्वारे केले जाते. साधी फुंकर मारून फुप्फुसांची कार्यक्षमता संगणकावर पाहिली जाते. यावरून सीओपीडीचे निदान आणि त्याची तीव्रता समजते. त्यावरून तज्ज्ञ डॉक्टर्स औषधोपचार ठरवतात.
सीओपीडीसाठी आज विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. श्वासावाटे घ्यावयाची औषधे अत्यंत परिणामकारक ठरतात; पण ती औषधे नियमितपणे घ्यावी लागतात.
सीओपीडीबरोबर जर हृदयविकार, मधुमेह किंवा पोस्टकोव्हिडसारखे विकार असतील तर, अशा व्यक्तींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित औषधोपचारासह आहारही महत्त्वाचा असतो. सीओपीडीचे रुग्ण हे कृश किंवा स्थूल असतात. कृश व्यक्तींनी वजन वाढवावे तर स्थूल व्यक्तींनी वजन कमी करावे. सर्व अन्नघटकांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे यांचा त्यात समावेश असावा. सीओपीडीच्या तीव्रतेनुसार नियमित हलका व्यायाम करावा. मानसिक ताणतणावांपासून कटाक्षाने दूर राहावे. सीओपीडी जर पुढच्या टप्प्यात गेला तर रुग्णाला छोट्या श्रमानेही दम लागतो.
कारण, प्राणवायूची गरज केवळ हवेतल्या प्राणवायूने भागत नाही. अशा व्यक्तींना अधिकचा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन घ्यावा लागतो. यात हयगय केली तर त्याचा परिणाम फुफ्फुसांवर तर होतोच; पण हृदयावर आणि सर्व शरीरावर होतो. त्यामुळे सीओपीडीसाठी विनाविलंब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी दिलेली औषधे नियमितपणे कायमस्वरुपी घ्यावीत. सीओपीडीच्या रुग्णांनी आणि नातेवाईकांनी सीओपीडी समजावून घेतला तर त्यावर मात करणे अवघड नाही.
कोव्हिडनंतरच्या या काळात प्रत्येकाने आपला श्वास सांभाळायला हवा. आपली फुप्फुसे निरोगी ठेवायला हवीत. कारण, कोव्हिडचा विषाणू नाकावाटे फुफ्फुसात प्रवेश करतो आणि फुफ्फुसांवर आक्रमण करतो. तीव्र न्यूमोनिया होऊन 'एआरडीएस' नावाची गंभीर अवस्था निर्माण होते. शरीरभर जंतूसंसर्ग होतो. आणि रुग्ण अत्यवस्थ होऊन दगावू शकतो. थोडक्यात, कोव्हिडसाठी शरीराचे प्रवेशद्वारच आहे. म्हणून आजच्या काळात आपली फुप्फुसे निरोगी असणे, हे कधी नव्हते इतके महत्त्वाचे ठरले आहे. आणि म्हणूनच 'जागतिक सीओपीडी दिनी' असे घोषवाक्य जाहीर झाले आहे.
सकस आहार, नियमित व्यायाम प्रदूषणविरहित परिसर आणि ताणतणाव मुक्त जीवन हे आपले शरीर निरोगी ठेवतात. आपली फुफ्फुसे सक्षम राहण्यासाठी प्राणायाम उपयोगी पडते. ज्यांना दीर्घकालीन श्वसन विकार आहे, त्यांनी आपला उपचार नियमितपणे घ्यावा. मधुमेह, उच्च रक्तदाब यासाठी सुरू असलेल्या औषधात खंड पडू देऊ नये. हे केले तर आपली फुफ्फुसे तर निरोगी राहतीलच; पण आपण दीर्घायुही होऊ.