भ्रष्टाचार : सव्वा लाखांची मागितली लाच; माळशिरस मुख्याधिकारी वडजेंवर गुन्हा

रस्ते कामाचे बिल काढल्यानंतर ठेकेदाराला 1 लाख 26 हजारांची लाच (भ्रष्टाचार) मागितल्याप्रकणरी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विश्वनाथ दिगंबरराव वडजे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सांगली लाच लुचपत विभागाने केली.
माळशिरसमधील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे काम सांगलीच्या एका ठेकेदाराने केले होते. त्याच्या कामाचे बिल माळशिरस मुख्याधिकारी वडजे यांनी ठेकेदाराच्या बँक खात्यावर जमा केले होते. बिल जमा केल्याच्या मोबदल्यात वडजे यांनी बिलाच्या 3 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली. याबाबत ठेकेदाराने 30 सप्टेंबर सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
ठेकेदाराच्या तक्रारीनुसार लाच (भ्रष्टाचार) लुचपत प्रतिबंधक विभागाने 22 ऑक्टोबरपर्यंत याची शहानिशा केली. अॅन्टी करप्शन विभागाने केलेल्या पडताळणीत माळशिरस नगरपालिकेचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी ठेकेदाराकडे डांबरीकरण केलेल्या कामाच्या बिलाचा चेक बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात 1 लाख रूपये व नवीन कामे मिळवून देण्यासाठीचा खर्च 26 हजार रूपये असे एकूण 1 लाख 26 हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी व 1 नोव्हेंबर रोजी वडजे यांच्याविरोधात अॅन्टीकरप्शनने सापळा लावला होता. याची कुणकुण वडजे यांना लागली. त्यामुळे वडजे यांनी ठेकेदाराकडून लाच घेतली नाही. परंतु लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरूध्द 17 नोव्हेंबर रोजी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सांगली अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, अविनाश सागर, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रितम चौगुले, संजय कलगुटगी, चालक बाळासाहेब पवार आदींनी केली.
हेही वाचलं का?
- NCP : वानखेडे प्रकरणावरून शरद पवारांचा नवाब मलिकांना पाठिंबा
- Raut Meets Thackeray : संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
- Anita Bose Pfaff : सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीने वाचाळ कंगना राणावतचे कान उपटले !