कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत खिंडी व्हरवडे येथे राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी! | पुढारी

कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत खिंडी व्हरवडे येथे राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी!

गुडाळ; आशिष पाटील : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे -पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय आज घेतला आहे. आज (दि. २४) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार निर्णय ही या बैठकीत जाहीर करण्यात आला. या बैठकीत पी जी पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आणि आंदोलनाचा आढावा घेतला.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अर्जुन पाटील, रमेश पाटील, ज्ञानदेव भोपळे, श्रीकांत पाटील, बिपिन पाटील, राजाराम पोवार, आनंदा भोपळे यांचीही भाषणे झाली. समाजाला आरक्षण नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा तरुण-तरुणींची कशी कुचंबना होते याचाही ऊहापोह काही वक्त्यांनी आपल्या भाषणात केला. याप्रसंगी आकाश तमायचे यांनी कंजारभाट समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. या बैठकीस गावातील सकल मराठा समाजातील युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार पांडुरंग पाटील यांनी मानले.

Back to top button