काेल्‍हापूर : खवय्यांना झटका; मटण दरात ४० रुपयांची वाढ | पुढारी

काेल्‍हापूर : खवय्यांना झटका; मटण दरात ४० रुपयांची वाढ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन-तीन वर्षांपासून 600 रुपये प्रतिकिलोवर स्थिरावलेल्या मटण दरात आता 40 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे काेल्‍हापूरातील  मटणाचा दर 640 रुपये प्रतिकिलो झाला आहे. नैसर्गिक उत्पादन असल्याने निर्मितीस मर्यादा, सातत्याने वाढत जाणारी मागणी याचबरोबर कोरोना, डिझेल व पेट्रोल दरवाढ अशा विविध कारणांनी मटणाच्या दरात वाढ करावी लागल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

मटणाचा दर 500 वरून 600 रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्यामुळे खवय्यांनी दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. यावर तोडगा म्हणून 600 रुपये गेल्या दोन वर्षांपासून मटणाचा दर 600 रुपये प्रतिकिलो स्थिर होता. या दरात नुकतीच 40 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने मटण 640 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

खाद्यतेल, डाळी पाठोपाठ मटण दरातही वाढ झाली आहे. मटणाला पर्याय असणार्‍या मासे, चिकन व अंड्याच्या दरातही सातत्याने दरवाढ होत आहे. यामुळे मांसाहार सर्वसामान्य-गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. विविध कारणांनी मटण दरात वाढ

मटणाला सातत्याने मागणी वाढली आहे. मटणासाठीच्या बकर्‍यांचे उत्पादन नैसर्गिक आहे. यामुळे मागणी तसा पुरवठा करण्यावर मर्यादा आहे. गतवर्षीपासून सुरू असणारा कोरोनाचा मोठा परिणाम इतर क्षेत्राप्रमाणेच मटण व्यवसायावरही झाला आहे. प्रमुख मोठ्या बाजारपेठा अद्याप पूर्ण क्षमतेने खुल्या झालेल्या नाहीत.

कराड, जत, आटपाडी, चाकण येथून मालाची आवक सुरु आहे. मात्र कर्नाटक राज्यातील बाजारपेठात ये-जा सुरु झालेली नाही. दिवाळीनंतर जत्रा-यात्रा सुरू झाल्या आहेत. पर्यटनामुळे हॉटेल्समध्येही मटणाला मोठी मागणी आहे. पुण्यासारख्या मेट्रो सिटीत 700 ते 750 रुपये प्रतिकिलो दर आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे बकरी वाहतुकीचेही दर वाढले आहेत. या सर्वांमुळे मटणाच्या दरात वाढ झाल्याची माहिती खाटिक समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी दिली.

हेही वाचलं का?

Back to top button