नायका कंपनीच्या फाल्गुनी नायर देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला | पुढारी

नायका कंपनीच्या फाल्गुनी नायर देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनातील अग्रगण्य ‘नायका’ कंपनीच्या संस्थापिका फाल्गुनी नायर या भारतातील सर्वाधिक श्रीमंत स्वयंभू महिला उद्योजक ठरल्या आहेत. फाल्गुनी 9 वर्षांच्या आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत 49 हजार कोटी रुपयांच्या स्वामिनी बनल्या आहेत!

‘नायका’ची निम्मी मालकी (50 टक्के शेअर्स) फाल्गुनी यांच्याकडे आहे. ‘नायका’चे मूल्यांकन आज जवळपास 1 लाख कोटी रुपयांना भिडलेले आहे. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 89 टक्क्यांनी वाढ झाली. शेअर बाजारामधील या भरभराटीने फाल्गुनी यांची एकूण संपत्ती 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सला भिडली. स्वत:च्या जोरावर सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट होण्याचा मान फाल्गुनी यांनी मिळवला, असे ‘ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स’ने नमूद केले आहे.

मेकअपच्या सर्वच वस्तू फाल्गुनी यांच्या ‘नायका’वर उपलब्ध आहेत. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 35 टक्क्यांनी वाढली. ‘नायका’च्या ई-प्लॅटफॉर्मला मोठा प्रतिसाद मिळाल्याने हे घडले.

पन्‍नाशीत सुरू केला नवा उद्योग

अहमदाबादेत फाल्गुनी यांनी शिक्षण घेतले. कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये नोकरी केली. एका कवितेच्या प्रेरणेने नोकरी सोडली आणि ‘स्टार्टअप’ची मुहूर्तमेढ रोवली. फाल्गुनी यांनी वयाची पन्‍नाशी ओलांडण्याआधी 2012 मध्ये ‘नायका’ कंपनीची स्थापना केली. या वयात लोक निवृत्तीच्या योजना आखत असतात.

कॅटरिना, आलियाही गुंतवणूकदार

‘नायका’तून आजवर मोठ्या 15 गुंतवणूकदारांनी विश्‍वास दाखविला आहे. हर्ष मरीवाला, दिलीप पाठक, टीव्हीएस कॅपिटलसारख्या गुंतवणूकदारांसह अभिनेत्री कॅटरिना कैफ तसेच आलिया भट्ट यांनीही ‘नायका’त आपला पैसा गुंतविला आहे.

Back to top button