भारत -चीन सीमेवर गंभीर स्थिती, लष्कराला सज्जतेचे आदेश | पुढारी

भारत -चीन सीमेवर गंभीर स्थिती, लष्कराला सज्जतेचे आदेश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाच्या चीन सीमेवरील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. त्यामुळे लष्कर, हवाई दल आणि नौदलाने अचानक होणार्‍या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी ‘शॉर्ट नोटीस’वर (सूचना मिळताच तत्काळ) सज्ज राहावे, असे आदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सेनादलांना बुधवारी दिले. हवाई दलाच्या कमांडर स्तरीय परिषदेला ते संबोधित करत होते.

‘एलएसी’वर चीनकडून सातत्याने कारवाया वाढत आहेत. तणावाच्या या स्थितीत सीडीएस (चिफ ऑफ दी आर्मी स्टाफ) जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी आणि हवाई दलाच्या टॉप कमांडर्सच्या उपस्थितीत संरक्षणमंत्र्यांनी हे वक्‍तव्य केल्याने त्याला महत्त्व प्राप्‍त झाले आहे. एलएसीवर कोणत्याही क्षणी ठिणगी पडू शकते, असे याआधीही लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्पष्ट केलेले आहे.

बुधवारच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की भविष्यात होणार्‍या युद्धात हवाई दलाची भूमिका निर्णायक ठरेल. हवाई दलाला कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), बिग डेटा हाताळणी आणि मशीन-लर्निंगच्या माध्यमातून आपल्या क्षमता वाढवाव्या लागतील. तिन्ही सैन्यदलांना ‘कॉमन थिएटर कमांड’च्या निर्मितीवर भर देण्याची सूचनाही सिंह यांनी केली.

हवाई दलाच्या या परिषदेचे नामकरण ‘एनश्युअरिंग सर्टनिटी अमिड्स्ट अनसर्टनिटी’ असे करण्यात आले होते. परिषदेचीही मध्यवर्ती कल्पनाच होती. अनिश्‍चिततेतही यश सुनिश्‍चित करणे, हा या परिषदेचा मंत्र होता.

कोरोना महामारीच्या काळातही प्रभावीपणे जबाबदारी पार पाडल्याबद्दल हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी सर्व कमांडर्सचे अभिनंदन केले.

Back to top button