वाळवा ऊसदर आंदोलन चिघळले; जयंत पाटील यांच्या कारखान्यांच्या वाहनांची तोडफोड | पुढारी

वाळवा ऊसदर आंदोलन चिघळले; जयंत पाटील यांच्या कारखान्यांच्या वाहनांची तोडफोड

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

वाळवा ऊसदर आंदोलन : वाळवा तालुक्यात ऊसदर आंदोलन पुन्हा पेटले आहे. बुधवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-बावची फाट्यादरम्यान राजारामबापू , हुतात्मा ,विश्वास साखर कारखान्याकडे निघालेल्या ३० ते ३५ ट्रॅक्टरची हवा सोडून तोडफोड केली. सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. तरीही कारखान्यांनी ऊस तोडी गतीने सुरू केल्या आहेत. एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे.

वाळवा ऊसदर आंदोलन : गांधीगिरी झाली आता दादागिरी सुरू

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी गांधीगिरी मार्गाने शेतकऱ्यांना, वाहतूक दारांना गुलाब पुष्प देवून आंदोलन करण्यात आले होते. बुधवारी रात्री बावची फाटा ते इस्लामपूर दरम्यान राजारामबापू, हुतात्मा, विश्वास साखर कारखान्याकडे निघालेली वाहने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. यावेळी चाकातील हवा सोडून, वाहनांची तोडफोड केली.

कारखाने जोपर्यंत एकरकमी एफआरपी जाहीर करत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोड घेऊ नये, वाहतूकदारांनी ऊस वाहतूक बंद ठेवावी असे आवाहन संघटनेने केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीसाठी टाळटाळ करीत आहेत. एकरकमी एफआरपी न देण्याची भूमिका राजारामबापू, क्रांती साखर कारखान्याची आहे. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी जयंत पाटील कारखान्यांवर दबावगट निर्माण करत आहेत.

भागवत जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना

Back to top button