राज्यात थंडी वाढली; उद्यापासून पाऊस शक्य | पुढारी

राज्यात थंडी वाढली; उद्यापासून पाऊस शक्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा

निरभ्र आकाशामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वार्‍यांचा प्रवाह वाढला. परिणामी, राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली. आता मात्र या थंडीला दक्षिण भारतात बरसत असलेल्या पावसाने अडथळा निर्माण केला आहे.
12 ते 14 नोव्हेंबर या तीन दिवसांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव शहरात (11 अंश सेल्सिअस) झाली. तर पुणे शहरात 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेल्या थंड वार्‍यांमुळे राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सर्वसाधारणपणे 1 ते 3 अंश सेल्सिअसने घसरले होते. अगदी दिवसादेखील थंडी जाणवत होती.

परंतु, दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध— प्रदेशसह आसपासच्या राज्यांत मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले.

त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. महाराष्ट्रात जळगावमध्ये सर्वात कमी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान

पुणे-11.8, नगर-14.1, जळगाव-11, कोल्हापूर-17.7, महाबळेश्वर-13.5, नाशिक-12.7, सांगली-16.2, सातारा-15.9, सोलापूर-13.1, औरंगाबाद-12.8, परभणी-13.2, नांदेड-16, बीड-13.1, अकोला-14.8, अमरावती-12.6, नागपूर-13.2, वाशिम-14, वर्धा-13.8, गोंदिया-12.6.

Back to top button