कोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या रॅकेट मधील एकाला अटक | पुढारी

कोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या रॅकेट मधील एकाला अटक

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे खात्यात, आयकर विभागात, भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो, असे नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देवून २७ युवकांची १ कोटी ४३ लाख रूपयांची फसवणूक केलेल्या रॅकेट मधील संशयित आरोपी मोहम्मद कामील अब्दुल गफार (सध्या रा. विनोबा भावे नगर, कुर्ला, मुंबई, मूळ रा. नूर नगर, अमरावती) याला कुरुंदवाड पोलिसांनी मुंबई आणि ठाणे येथे सापळा रचून मंगळवारी (दि. १६) मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या :

या फसवणुकीची फिर्याद आनंदा गणपती करडे (रा. ढेपणपुर गल्ली, कुरूंदवाड) यांनी १३ डिसेंबर २०२२ रोजी दिली होती. संशयित आरोपी अब्दुल गफार याला जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी अब्दुल गफ्फार याने फिर्यादी करडे यांना मी तुमच्या मुलग्याच्या नोकरीचे काम करतो, मुबई, ठाणे येथे येऊन भेटा, असे सांगितल्यानंतर सपोनि रविराज फडणीस यांनी सदर गुन्ह्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शन घेऊन उपनिरीक्षक सागर पवार, पोलिस कॉन्स्टेबल सागर खाडे, नागेश केरीपाळे यांचे पथक मुंबईला पाठवले. मंगळवारी सकाळी संशयित आरोपी भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात तो अडकला.

यातील मुख्य आरोपी अनिस खान गुलाम रसुलखान (वय ४६, रा. १३७ काटोल रोड, गोटिक खान (कटोलोड) नागपुर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (रा. प्लॉट नं. ८ साल्ट लाखे बायपास, एल.बी.चौक सेक्टर ३ कोलकत्ता), सुबोधकुमार (रा. पश्चिम राजबटी मध्याग्राम दक्षिण २४ परगनास कलकत्ता) आणि श्रीमती क्रांती कुमार पाटील (रा.फुलेवाडी, ता.करवीर जि.कोल्हापूर) यांना पकडण्यासाठी कलकत्ता, दिल्ली येथे पथक रवाना करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

कुरुंदवाड येथील आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग दिल्ली येथे तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो, असे संशयित आरोपींनी सांगत आर्मीत ३५ मुलांची बॅच पाठवायची आहे. आणखीन मुले असतील तर घेऊन या असे आमिष दाखवले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील २७ युवकांच्याकडून १ कोटी ४३ लाख रुपये खात्याद्वारे स्वीकारले. युवकांना ट्रेनिंगसाठी कलकत्ता येथील कमांडर हॉस्पिटल येथे हजर करण्याचा बनाव करत विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. नोकरीचे नियुक्ती पत्र पोस्टाने येईल, असे सांगून परत पाठवले. त्यानंतर २५ जुलै २०२२ पासून संशयित आरोपींनी फोन बंद करत संपर्क तोडल्याने हे भामटे असल्याची खात्री झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button