

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पार्ट टाइम जॉबचे प्रलोभन दाखवून उच्चशिक्षित तरुणाला टास्क फ्रॉडद्वारे तब्बल 35 लाखांचा गंडा घालणार्या टोळीतील एका आरोपीस सायबर पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेने टास्क फ्रॉडचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. संबंधित आरोपी फसवून घेतलेली रक्कम ही क्रिप्टो करंन्सीमध्ये वर्ग करून देत होता. तुषार प्रकाश अजवानी (37, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपींनी व्हॉट्सअॅपव्दारे संपर्क साधून पार्ट टाइम नोकरीच्या बहाण्याने गुगल सर्चचे टास्क दिले होते.
त्यांना टास्क पूर्ण केल्यावर कमिशन म्हणून बँक अकाउंटला काही किरकोळ रक्कम जमा करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक फायद्याकरिता टेलिग्राम ग्रुपवर प्रीपेड टास्क करण्यास सांगून वेळोवेळी जास्त रक्कम डिपॉझिट करण्यास लावली. त्यांच्याकडून विविध टास्क करून घेतले व कोणताही परतावा न देता 34 लाख 97 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. तपासात ही रक्कम ट्रान्सफर केलेल्या बँक खाते क्रमांकाची माहिती घेण्यात आली.
तसेच या अकाउंटमधून गुन्ह्यातील काही रक्कम एका पेमेन्ट गेटवे कंपनीच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या कंपनीच्या एजन्टकडे तपास केला असता, अजवानी याने पुरविलेल्या वॉलेट अॅड्रेसवर फसवणुकीची रक्कम यूएसडीटीच्या स्वरूपात ट्रान्सफर झाल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. या माहितीच्या आधारे आरोपी हा जुहू येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले. त्यांनी आरोपीला अटक करून एक अॅपल कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत केला. याप्रकरणातील त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा