

कुरुंदवाड , पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड शहर सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी आदर्श नगरी आहे. या नगरीतून सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरण पूरक, सामाजिक उपक्रमाने व पारंपरिक वाद्याचा वापर करून शांततेत गणेशोत्सव साजरा करावा आणि एक दुसरी नवीन परंपरा सुरू करावी, असे प्रतिपादन इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीरसिह साळवी यांनी केले. दरम्यान, गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर सायबर क्राईमची करडी नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत असताना सामाजिक हित जोपासत करावे, असेही उपअधीक्षक साळवी यांनी सांगितले. येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे शुक्रवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बोलविण्यात आलेल्या बैठकीत उपाधीक्षक साळवी बोलत होते.सपोनी रविराज फडणीस,उपनिरीक्षक सागर पवार,माजी नगरसेवक उदय डांगे,अभिजित पवार,भाजपचे राजेंद्र फल्ले,पोलीस पाटील संघटनेचे मानसिंग भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना स.पो.नी फडणीस म्हणाले गणेश उत्सव साजरा करत असताना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जातीय सलोखा राखला पाहिजे याची खबरदारी सर्व मंडळांनी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासन व शासनाने दिलेल्या अटी नियमांचे पालन करावे असे सांगत गणेशोत्सव आगमन व विसर्जनावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले.
यावेळी बबलू पवार,जितेंद्र साळुंखे,प्रवीण खबाले,जाफर पटेल आदींनी वेळ वाढवून मिळावी यासह उपक्रम राबवताना काही अटी शिथिल कराव्यात आणि वीज वितरण कंपनीने अनंत चतुर्थी पर्यंत वीज पुरवठा खंडित करू नये अशा सूचना मांडत पोलीस प्रशासनाच्या आवाहनानुसार उत्सव साजरा करण्याची ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे तानाजी आलासे,शिवसेनेचे सोमेश गवळी,रमेश जाधव,शुभम जोंग,शरद पवार,अविनाश टाकळे, विराज पाटील, वृषभ डांगे, महेश आलासे,किरण मालगावे, महादेव माळी,तानाजी शिकलगारसह कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध मंडळांची पदाधिकारी व पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.