कोल्हापूर : कुरुंदवाड शहरात ऑनलाईन कॅसिनो, मटका तेजीत | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाड शहरात ऑनलाईन कॅसिनो, मटका तेजीत

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड शहरात ऑनलाईन कॅसिनो लॉटरी मटका व्यवसाय तेजीत चालू आहे. व्यवसायाने शहरावर चांगलीच पकड केली आहे. खुलेआम मोक्याच्या ठिकाणी चालणार्‍या या ऑनलाईन लॉटरी मटक्यामुळे युवक, मजूर या मटक्याच्या आकडेमोडीत गुंतत चालले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यालाच ऑनलाईन कॅसिनो लॉटरी मटक्याच्या अड्ड्याचा विळखा पडला आहे. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामान्य नागरिक मात्र हैराण झाले आहेत.

येथील माळ-भाग,मजरेवाडी रस्ता आणि उद्यानाजवळ 7 ते 8 ऑनलाइन कॅसिनो लॉटरी मटका केंद्रे थाटली आहेत.हा व्यवसाय तेजीत आहे. हे बेकायदेशीर उद्योग थातुरमातुर कारवाईनंतर पुन्हा डोके वर काढत आहेत.दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे.ग्रामीण भागातील तरुण मुले,मजूर आणि काही नोकरदार झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत.चालक ऑनलाइन मटक्यामध्ये बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून शासनाचा जी.एस.टी. बुडवत आहेतच याबरोबर खेळणाऱ्यांची ही थेट फसवणूक होत आहे.यातून ते कंगाल होऊन व्यसनाधीनता वाढत चालली आहे.या फसवणुकीवर कारवाई करावी अशी अनेकवेळा फसवणूक झालेल्या युवकांनी पोलीसात तक्रार दिली आहे.

पोटाची भूक भाग्वण्यासाठी धडपड करत असलेले या कॅसिनो ऑनलाईन लॉटरी मटक्याचे बळी ठरत आहेत. दिवसभर मेहनत करून कमावणारे आपले पैसे यावर उधळत असल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत. ४ महिन्यांपूर्वी कॅसिनोमध्ये पैसे गमावल्याच्या रागातून चालकाशी वादावादी होऊन सिनेस्टाईलने हाणामारी झाली होती.याबाबत पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले होते.मात्र कारवाई का झाली नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.याकडे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे.

नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासनाचा चालढकलपणा

बहुतांश कॅसिनो लॉटरी मटका शाळेच्या आणि सार्वजनिक आवारात आहेत. या व्यवसायांना काही बड्या राजकारणी लोकांचा देखील पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पोलीस प्रशासन कारवाई करण्यास हात आखडता घेत आहेत. ऐतिहासिक नगरीत हे अनधिकृत व्यवसाय हद्दपार होण्यासाठी पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button